मुंबई, पुण्यातील लॉकडाऊन १५ दिवसाने वाढू शकतो

- महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – देशभरात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन ३ मे नंतर मागे घेण्यात आला, तरी मुंबई आणि पुण्यातील लॉकडाऊन वाढू शकतो, अशी शक्यता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांनी व्यक्त केली आहे. मुंबई आणि पुण्यातील कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास सरकार निदान या शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन आणखी १५ दिवसाने वाढविण्याचा निर्णय घेऊ शकते, असे राज्य सरकारने स्पष्ट केले.

देशात कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक संक्रमण महाराष्ट्रात झाले आहे. देशातील आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. शनिवारी राज्यात २२ जणांचा या साथीत बळी गेला. एकाच दिवसात राज्यात ८११ नवे रुग्ण आढळले. चोवीस तासात नोंद झालेली राज्यातील आतापर्यंतची कोरोनाव्हायरसची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या आता ७,६२८ वर पोहोचली आहे. मुंबईत चोवीस तासात १२ जण दगावले असून २८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. पुण्यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण रुग्णांची संख्या १,१०५ वर गेली आहे. मुबईतील या साथीच्या बळींची संख्या १९१ झाली असून पुण्यात आतापर्यंत ७९ जण दगावले आहेत.

राज्यात मुंबई आणि पुणे ही दोन शहरांमध्ये या साथीचे रुग्णांची संख्या सतत वाढत असून यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. येथे कर्तव्य बजाविणाऱ्या काही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार आणि पोलिसांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी मुंबईत एका पोलीस हवालदाराचा या साथीत बळी गेला. या साथीत पोलिसाचा बळी जाण्याची राज्यातील ही पहिली घटना आहे. धरावीसारख्या जगातील सर्वात दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई आणि पुणे या दोन शहरातील लॉकडाऊन ३ मे नंतरही वाढविला जाऊ शकतो असे म्हटले आहे. लॉकडाऊनचा मुख्य उद्देश या साथीचे संक्रमण थांबविणे आहे. मात्र या शहरांमधील हा फैलाव थांबला नाही, तर या शहरांमधील निदान हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये तरी लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकार घेईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

मुंबईत सध्या ९३० कंटेन्मेंट झोन अर्थात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने प्रतिबंधित केलेली क्षेत्र आहेत. यातील ३०० रेड झोनमध्ये रुग्ण सतत आढळून येत आहेत. मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊनचे पालन झाले नाही, तर संक्रमण वाढण्याचा धोका आहे, असे स्पष्ट करीत केंद्रीय गृहमंत्रालयाने बजावले होते. तसेच या दोन शहरात परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना करण्यासाठी आपले पथके पाठवली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या दोन शहरात लॉकडाऊन वाढविण्याचे दिलेले स्पष्ट संकेत महत्वाचे ठरतात.

दरम्यान मालेगाव, धुळे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड या शहरातही रुग्ण आढळत आहेत. मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक विभागात चिंताजनक स्थिती आहे. नाशिक विभागात आतापर्यंत या साथीने २० जण दगावले आहेत आणि २१५ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

leave a reply