कोरोनाव्हायरस म्हणजे चीनने केलेली महाभयंकर चूक

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरस ही चीनने केलेली महाभयंकर चूक ठरते, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धारेवर धरले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, कोरोनाची साथ चीनच्या प्रयोगशाळेतूनच पसरली, असा दावा केला. तर कोरोनाव्हायरसच्या साथीने, चीन हाच अमेरिकेसाठी सर्वात मोठा सामरिक धोका असल्याचे दाखवून दिल्याची घणाघाती टीका अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ यांनी केली. या साऱ्या प्रतिक्रिया अमेरिकेने चीनच्या विरोधात राजनैतिक पातळीवरील युद्ध पुकारल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

अमेरिकेच्या ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाने कोरोनाव्हायरस साथीवर अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात चीनने साथीची व्याप्ती जाणूनबुजून दडवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ‘चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने उर्वरित जगापासून साथीची तीव्रता सातत्याने लपविली व याच काळात साथीशी संबंधित वैद्यकीय उत्पादनांचा मोठ्या प्रमाणातील साठा करून घेतला. याच साठ्याचा वापर करून चीनने देशातील साथीवर नियंत्रण मिळवले’, या शब्दात अमेरिकी यंत्रणेने चीनला लक्ष्य केले. चीनने कोरोनाव्हायरस संसर्गजन्य साथ असल्याचेही दडपून ठेवल्याची टीकाही अमेरिकी यंत्रणेच्या अहवालात करण्यात आली.

हा अहवाल म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेकडून कोरोनाव्हायरसच्या मुद्यावर चीनविरोधात सुरू असलेली मोहिम अधिक आक्रमक करण्याचा प्रयत्न दिसंत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प गेले काही दिवस सातत्याने चीनवर टीकेचे आसूड ओढत आहेत. परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओदेखील साथीसाठी चीनच जबाबदार असल्याचा आरोप करून त्याची किंमत चीनच्या राजवटीला चुकवावी लागेल, असे इशारे देत आहेत. अमेरिकेचे इतर वरिष्ठ नेत्यांनीही चीनला लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे.

काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या माजी दूत निक्की हॅले यांनी साथीच्या मुद्यावर चीनला फटकारत कम्युनिस्ट राजवटीविरोधात मोहीम छेडली होती. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री काँन्डोलिझा राईस यांनीही चीनच्या राजवटीवर दडपण कायम ठेवण्याची भूमिका घेतली होती. आता वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ यांनी साथीच्या पार्श्वभूमीवर चीनला थेट सामरिक धोका ठरवून अमेरिकेचे राजनैतिक युद्ध अधिकच तीव्र होत असल्याचे दाखवून दिले. अमेरिकेच्या संसदीय समितीचे सदस्य असणाऱ्या क्रूझ यांनी, आगामी काळात अमेरिका व चीनमधील संबंधात मूलभूत बदल होण्याची शक्यताही व्यक्त केली.

ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून बदलांची सुरुवात अर्थ व व्यापार क्षेत्रातून होण्याचे संकेत दिले. कोरोनाव्हायरस साथीच्या मुद्यावर चीनमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन यापुढे चीनवर अवलंबून राहण्याचे टाळण्यासाठी पावले उचलली जातील, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची आक्रमक वक्तव्ये आणि त्यांचे सहकारी मंत्री, वरिष्ठ नेते तसेच अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारे संकेत यातून अमेरिका यापुढच्या काळात अधिकच कठोर होत जाईल, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. चीनलाही त्याची जाणीव झाल्याचे दिसत आहे.

leave a reply