जग कोरोनाशी लढत असताना पाकिस्तानकडून दहशतवादाचा प्रसार

- पंतप्रधान मोदी यांची टीका

नवी दिल्‍ली – सारे जग कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करीत आहे. पण काहीजण मात्र दहशतवाद आणि फेक न्युज सारखे विषाणू पसरविण्यात गुंतलेले आहेत, अशा थेट शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान वर हल्ला चढविला. अलिप्ततावादी चळवळीच्या सदस्य देशांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा दहशतवाद आणि फेक न्युज द्वारे केल्या जाणाऱ्या भारत विरोधी अपप्रचाराचा समाचार घेतला.

सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी अलिप्ततावादी चळवळीचे सदस्य असलेल्या देशांची संवाद साधला. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया अशा दोन गटांमध्ये जगाची विभागणी झालेली असताना भारताने पुढाकार घेऊन या दोन्ही घटना पासून वेगळे राहून अलिप्त धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या ‘नॉन अलाइन मूव्हमेंट’ची (एनएएम – नाम) स्थापना केली होती. या संघटनेचे 120 देश सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारताने पुन्हा या चळवळीकडे लक्ष केंद्रित केले असून त्याला या संघटनेचा सदस्य देशांकडून नाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाव्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नाम जगाची एकजूट वाढवून यासाठीचा मुकाबला करू शकते असा विश्वास व्यक्त केला.

पुढच्या काळात नामने जागतिक आरोग्य संघटनेकडे विकसनशील व गरीब देशांच्या आरोग्य यंत्रणा विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची मागणी करावी असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. तसेच कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना भारत जगाचा फार्मसी बनला आहे. भारत जगभरातील देशांना औषधांचा पुरवठा करीत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. मात्र आपल्या भाषणात पंतप्रधानांनी थेट नामोल्लेख न करता पाकिस्तान वर केलेली जहाल टीका भारतीय माध्यमांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी ठरली. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह पाच जवान शहीद झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पाकिस्तान वर केलेली ही टीका जगभरातील निरीक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

सारे जग कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करीत असताना काहीजण मात्र दहशतवाद आणि फेक न्यूज यांचे भयंकर विषाणू पसरविण्यात गुंतलेले आहेत, अशी मर्मभेदी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. फेक न्यूज आणि बनावट व फेरफार करून तयार केलेले व्हिडिओज पसरवून देशांमध्ये आणि समुदायांमध्ये फूट पाडण्याचे भयंकर कारस्थान काही जणांकडून आखले जात आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतातील घडामोडीवर तसेच भारताच्या राजकीय नेतृत्वावर असभ्य शब्दात टीका करीत आहे. यावर पाकिस्तानच्या काही समंजस विश्लेषकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

कोरोनाव्हायरसच्या साथीला घाबरून भारताच्या राजकीय नेतृत्वाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, अशी शेरेबाजी इम्रान खान यांनी केली होती. मात्र भारतावर अशी शेरेबाजी करण्यापेक्षा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात काय चालले आहे त्याकडे लक्ष द्यावे. पाकिस्तानची परिस्थिती अधिक चिंताजनक असून कोरोनाव्हायरसची साथ पुढच्या काळात पाकिस्तानात थैमान घालणार असल्याची भीती, पाकिस्तानातील काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांनी दहशतवाद व खोटा प्रचार याचा वापर करून भारतावर टिपणी करणाऱ्या पाकिस्तानला लक्ष केल्याचे दिसत आहे.

leave a reply