कोरोनाव्हायरसचे युरोपात सुमारे १२ हजार बळी

गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने इटलीमध्ये ७४३ जणांचा बळी घेतला तर स्पेनमध्ये या विषाणूने ७३८ जण दगावले. यामुळे इटली पाठोपाठ स्पेनमधील एकूण बळींची संख्या चीनपेक्षा अधिक झाली आहे. तर फ्रांस, ब्रिटन, नेदरलॅंड, बेल्जियम या देशांमध्येही बळींची संख्या वेगाने वाढत आहे. 

जगभरात कोरोनाव्हायरसने गेलेल्या बळींची एकूण संख्या १९,७६६ वर पोहोचली असून ४,४१,३७२ जणांना याची लागण झाली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये युरोप हे या विषाणूचे नवे केंद्र ठरत आहे. यासाठी युरोपिय नागरिकांची बेफिकिरी कारणीभूत ठरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आतापर्यंत युरोपमध्ये जवळपास बारा हजार जणांचा बळी गेला तर २,२०,७८५ जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती युरोपिय महासंघाने दिली. एकट्या इटलीमध्ये ६९ हजाराहून अधिक जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली तर ६,८२० जण दगावले आहेत. गेल्या चोवीस तासात या देशातील पाच हजार दोनशे जणांना या विषाणूची बाधा झाली असून या साथीचा फैलाव इटलीच्या इतिहासातील सर्वात भयंकर आव्हान ठरत आहे.

स्पेनमधील परिस्थिती देखील फारशी वेगळी नसून गेल्या चोवीस तासात दगावलेल्यांची संख्या ७३८ ने वाढल्याने एकूण बळींची संख्या ३४३४ वर गेली आहे. इटलीप्रमाणे स्पेनमधील वैद्यकीय सेवांवर देखील जबरदस्त ताण पडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मृतदेह ठेवण्यासाठी शवागरे कमी पडू लागल्याने स्पेनच्या यंत्रणांनी इनडोर स्टेडियमचे रुपांतर शवागरात करण्यास सुरुवात केली आहे. तर स्पेनने तातडीने चीनकडून ४३ कोटी युरोंच्या वैद्यकीय साहित्याची खरेदी केली आहे. 

इटली, स्पेननंतर कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक फटका फ्रांसला बसला आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी देशात लॉकडाउन जाहीर करुनही कोरोनाचे बावीस हजाराहून अधिक रूग्ण आढळले आहेत. यातील १,१०० जण मृत्यूमुखी पडले आहेत. अवघ्या चोवीस तासात फ्रांसमधील या साथींच्या बळींची संख्या २४०ने वाढली आहे. तर ब्रिटनमधील बळींची संख्या ८७ने वाढून ४२२ वर पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये किमान ९० हजार जणांची वैद्यकीय तपासणी झाली असून यापैकी आठ हजार जण कोरोनाव्हायरसने बाधित झाल्याचे उघड झाले.

या कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे युरोपमधील मोठे देश लॉकडाउनमध्ये गेले आहेत. या विषाणूचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर कमालीचा ताण येत असल्याची तक्रार इटली, स्पेन, फ्रांस, बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगाल, आयर्लंड, स्लोवेनिया आणि लक्झम्बर्ग या नऊ देशांनी ‘कोरोना-बॉन्ड’ची आणण्याची मागणी केली आहे. या मागणीवर निर्णय घेण्यासाठी युरोपिय महासंघाची तातडीची बैठक होणार आहे.

leave a reply