जगभरात चोवीस तासात कोरोनाव्हायरसचे सात हजाराहून अधिक बळी

- रशियन पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण

वॉशिंग्टन/मॉस्को – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने जगभरात सात हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत या साथीचे सर्वाधिक रुग्ण दगावले असून देशात कोरोनाची दुसरी लाट परतू शकते, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी देत आहेत. दरम्यान, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांना देखील या साथीची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या २,३६,८०१ वर गेली असून या साथीचे सुमारे साडे तेहत्तीस लाख रुग्ण असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. तर किमान १०,६२,८३५ जण या साथीतून बरे झाल्याचे समाधानही व्यक्त केले जाते. अमेरिकेत या साथीचे सर्वाधिक ६२,९०६ बळी गेले आहेत. गेल्या चोवीस तासात या देशात २,०५३ जणांचा बळी गेला असून ६० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

इटलीमध्ये या साथीने २८,२३६ जणांचा बळी घेतला असून गेल्या चोवीस तासात २६९ जण दगावले आहेत. तर गेल्या तीन दिवसात स्पेन आणि फ्रान्सपेक्षाही अधिक जण ब्रिटनमध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. ब्रिटनमध्ये २७,५१० जणांचा बळी गेला असून गेल्या चोवीस तासात या देशात ७३९ बळींची वाढ झाली आहे. यानंतर स्पेनमध्ये २४,८२४ आणि फ्रान्समध्ये २४,३७६ जणांचा बळी गेला आहे.

रशियामध्ये गेल्या चोवीस तासात या साथीने ९६ जणांचा बळी घेतला असून ७,९३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रशियात या साथीचे एक लाख चौदा हजाराहून अधिक रुग्ण असून पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांनी आपण कोरोनाबाधित असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मिखाईल यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ही माहिती देऊन क्वारनटाईन असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, रशियातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तुलनेत बळींची संख्या कमी असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. राष्ट्राध्यक्ष पुतिन बळींची संख्या दडवित असल्याचा आरोप त्यांचे राजकीय विरोधक करू लागले आहेत.

leave a reply