कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या ‘वुहान लॅब’मधूनच झाला

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पुनरुच्चार

वॉशिंग्टन – चीनच्या वुहानमधील लॅबमध्येच कोरोना साथीचा उगम झाला, या आरोपाचा पुनरुच्चार करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेलाही धारेवर धरले. ही संघटना चीनची प्रचारमोहिम राबविणाऱ्या एजन्सी प्रमाणे काम करीत असल्याचा ठपका ट्रम्प यांनी ठेवला. त्याचवेळी कोरोना साथीच्या मुद्यावरून चीनवर कर लादण्याचा इशाराही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाव्हायरस साथीवरून पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले. ‘अमेरिका साथीच्या उगमाचा तपास करीत आहे. पण जे काही घडले ते अत्यंत भयंकर आहे. चीनने चूक केली की साथीची सुरुवात निव्वळ चुकीतून झाली आणि त्यानंतर ते चुका करीत राहिले, याबाबत माहिती नाही. कदाचित कोणीतरी विशिष्ट हेतूनेही जाणूबुजून काही घडविलेले असू शकते,’ असे सांगून ट्रम्प यांनी साथीसाठी चीनच जबाबदार असल्याचा पुनरुच्चार केला.

चीनला जबाबदार धरतानाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने त्या काळात घेतलेल्या निर्णयांवरही संशय व्यक्त केला. साथीची सुरुवात झाल्यानंतर चीनने देशांतर्गत प्रवासावर निर्बंध घातले मात्र परदेशातील प्रवास सुरु ठेवला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हे टाळले असते तर चीनला ही साथ रोखता आली असती, असा दावा ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी अमेरिका चीनवर व्यापारी कर लादण्याची कारवाई करेल, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.

यावेळी ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख चीनची ‘पीआर एजन्सी’ असा करून आरोग्य संघटनेला जबरदस्त टोला लगावला.

कोरोनाव्हायरसची साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली हे सिद्ध झाले, तर चीनला त्याचे भयंकर परिणाम भोगायला लागतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी दिली होती. तर डिसेंबर महिन्यातच चीनकडे या साथीची माहिती होती, पण चीनने ही माहिती दडवून ठेवली आणि अमेरिका चीनचा हा खोटारडेपणा साऱ्या जगासमोर उघड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला होता. ट्रम्प यांचे नवे वक्तव्य अमेरिकेने चीनच्या विरोधात राजनैतिक पातळीवरील युद्धाची तीव्रता अधिक वाढविल्याचे संकेत देत आहे.

leave a reply