जगाने कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाठीही तयार रहावे

- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

ब्रुसेल्स – ‘कोरोनाव्हायरसची लस इतक्यात सापडणे शक्य नसून आंतरराष्ट्रीय समुदायाने कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाठी तयार रहावे’, असा इशारा ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. ‘डब्ल्यूएचओ’ ही संघटना चीनची प्रसिद्धी करणाऱ्या कंपनी सारखे काम करीत असल्याचा मर्मभेदी आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी केला होता. कोरोनाव्हायरसची साथ चीनमध्ये झपाट्याने फैलावत असताना ‘डब्ल्यूएचओ’ने चीन अडचणीत येऊ नये म्हणून त्याबाबतची माहिती उघड करण्याचे टाळले. यामुळे ही साथ जगभरात पसरली, असा ठपका अमेरिका, जपान व तैवान या देशांनी ठेवला आहे. असे आरोप होत असताना देखील ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाव्हायरस मानवनिर्मित नसल्याचे सांगून चीनचा पुन्हा एकदा बचाव केल्याचे दिसत आहे.

‘कोरोनाव्हायरसची साथ इतक्या लवकर संपुष्टात येणार नाही. जगातील प्रत्येक देशाने या साथीच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार रहावे. या साथीचा पहिला टप्पा नियंत्रणात येईल, तेव्हा जो वेळ मिळेल, त्याकाळात जगाने या साथीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाठी तयारी करावी किंवा येत्या काळातील याहून भीषण साथीसाठी तयार रहावे’, असे ‘डब्ल्यूएचओ’चे युरोपमधील प्रमुख डॉ. हँस क्लूग यांनी बजावले. तर युरोप अजूनही या साथीच्या विळख्यात असल्याचा इशारा क्लूग यांनी दिला. कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेचे इशारे देत असताना, क्लूग यांनी कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

अमेरिका, ब्रिटन, जपान, तैवान आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश चीनच्या वूहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाव्हायरसची निर्मिती झाली, असा संशय व्यक्त करीत आहेत. यापैकी काही देशांमधून तर कोरोनाव्हायरस हा चीनच्या जैविक युद्धाचा भाग असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. चीनच्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीपटातून याचे दाखले मिळत असल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमांनी केले आहेत. यामुळे आपला बचाव करणे चीनसाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे. त्यातच कोरोनाव्हायरसचा जबर तडाखा बसलेल्या देशांनी चीनकडून जबर नुकसानभरपाई वसूल करण्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत आपला बचाव करणे चीनसाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे.

असे असतानाही ‘डब्ल्यूएचओ’ मात्र चीनचे पाठराखण करण्याचे धोरण सोडायला तयार नाही. कोरोनाव्हायरस मानवनिर्मित नसून नैसर्गिक असल्याचा दावा ‘डब्ल्यूएचओ’चे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. सध्या ‘डब्ल्यूएचओ’वर चीनचा अतिरेकी प्रभाव असून ही संघटना चीनचा प्रसिद्धीप्रमुख यासारखी कार्यरत आहे, अशी घणाघाती टीका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. या टीकेला उत्तर किंवा खुलासा देण्यापेक्षा ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाव्हायरसच्या नव्या साथीसाठी तयार रहा, असा इशारा साऱ्या जगाला दिला आहे. ही बाब सूचक ठरत असून अमेरिकेच्या व इतर देशांनी केलेल्या आरोपांची आपल्याला पर्वा नाही, असा संदेश ‘डब्ल्यूएचओ’चे नेतृत्व देऊ पाहत आहे.

leave a reply