‘बीजिंग ऑलिंपिक’वर बहिष्कार टाकणार्‍या देशांना जबर किंमत मोजावी लागेल

- चीनने धमकावले

बहिष्कारबीजिंग – पुढील वर्षी चीनमध्ये होणार्‍या बीजिंग विंटर ऑलिंपिक्सवर राजनैतिक बहिष्कार टाकणार्‍या अमेरिका व इतर देशांना त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी चीनने दिली आहे. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनमध्ये होणार्‍या ‘विंटर ऑलिंपिक्स’वर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कॅनडा, ब्रिटन व ऑस्ट्रेलियानेही राजनैतिक बहिष्काराची घोषणा केली होती. या बहिष्काराला आपण काडीचीही किंमत देत नसल्याचे सांगणार्‍या चीनने आता या देशांना धमकावत आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून चीनमधील मानवाधिकारांच्या मुद्यावर पाश्‍चात्य देश आग्रही भूमिका घेत असल्याचे समोर येत आहे. हॉंगकॉंग, तिबेट, तैवान, साऊथ चायना सी यासह झिंजिआंगमधील उघूरवंशियांच्या मुद्यावर अमेरिका व मित्रदेशांनी जोरदार आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने उघूरवंशियांवर होणार्‍या बहिष्कारअत्याचाराचा उल्लेख वंशसंहार म्हणून केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातूनच चीनमध्ये २०२२ साली होणार्‍या विंटर ऑलिंपिक्सवर बहिष्कार टाकण्यात यावा, अशी मागणी समोर आली होती.

विविध देशांच्या संसद सदस्यांसह मानवाधिकार व स्वयंसेवी संघटनांनी या मागणीसाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली होती. सोमवारी अमेरिकेने यासंदर्भात घोषणा केल्यानंतर कॅनडा, ब्रिटन व ऑस्ट्रेलियानेही त्याला पाठिंबा देत राजनैतिक बहिष्काराचा निर्णय जाहीर केला. अमेरिकेसह या चारही देशांनी आपले बहिष्कारअधिकारी ऑलिंपिकला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजनैतिक बहिष्काराची मोहीम सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चीनच्या सत्ताधार्‍यांनी, अशा बहिष्काराला आपण किंमत देत नसल्याची भूमिका घेतली होती.

मात्र चार देशांनी एकापाठोपाठ केलेल्या घोषणेनंतर चीनने आपला पवित्रा बदलल्याचे दिसत आहे. ‘अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व कॅनडा ऑलिंपिकसारख्या व्यासपीठाचा वापर राजकीय हेतूंनी करीत आहेत. ही बाब त्यांना वेगळे पाडणारी तसेच इतर देशांना न पटणारी आहे. अशा चुकीच्या कृत्याबद्दल या देशांना जबर किंमत मोजणे भाग पडेल’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी बजावले.

leave a reply