‘गगनयान’ मोहिमेआधी भारत दोन मानवरहीत अंतराळ मोहिमा राबविणार

- केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग

नवी दिल्ली – २०२२ च्या अखेरीस ‘गगनयान’ ही मानवी अंतराळ मोहीम हाती घेण्यात येणार होती. पण त्यापूर्वी ‘व्हिनस मिशन’ आणि ‘सौर मिशन’ या दोन मानवरहीत अंतराळमोहिमा हाती घेण्यात येणार आहेत. त्याचवेळी २०३० सालापर्यंत भारताचे अवकाशस्थानक उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत दिली. अंतराळातील कचरा काढण्यासाठी इस्रोतर्फे संशोधन हाती घेण्यात आल्याचेही सिंग म्हणाले.

२०२२ च्या अखेरीस ‘गगनयान’ ही मानवी अंतराळ मोहीम हाती घेण्यात येणार होती. त्याआधी मानवरहित ‘शुक्र मोहिम’ आणि ‘गगमयान’ मोहिमेनंतर सौर मिशन (आदित्य) राबविण्यात येणार होते. मात्र आता या दोन्ही मोहिमा गगनयान मोहिमेआधी पार पडणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे या मोहिमांना विलंब झाला आहे. त्यामुळे येत्या काळात विलंब झालेल्या या मोहिमांना वेग देण्यात येईल, असे सिंग यांनी सांगितले.

‘गगनयान’ मोहिमेआधी भारत दोन मानवरहीत अंतराळ मोहिमा राबविणार - केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंगपुढील वर्षाच्या सुरुवातीलाच मानवरहित मोहिमा हाती घेण्यात येतील. त्यासाठी रोबोज्चा वापर करण्यात येईल. तर ‘गगनयान’ मोहीम २०२३ मध्ये हाती घेण्यात येईल. गगनयान मोहिमेमुळे भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतर मानवी अंतराळ मोहीम राबविणारा चौथा देश ठरेल. गगनयानचे डिझाईन पूर्ण करण्यात आले आहे. तर यातील वेगवेगळ्या यंत्रणा पूर्ण करण्याचे काम करण्यात येत आहे. यानाच्या जमिनीवरील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी बंगळुरूमध्ये सुविधा उभारण्यात आली आहे. या मोहिमेसाठी सुमारे नऊ हजार २३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताची क्षमता सर्वांना दिसून येईल, असा विश्‍वास पृथ्वी विज्ञानमंत्री सिंग यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उपग्रह प्रक्षेपणात आपला दबदबा निर्माण करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतराळातील कचरा नष्ट करण्यासाठी पुढे सरसावली आहे. अंतराळातील कचरा काढण्यासाठी संशोधन आणि विकासकार्य हाती घेतल्याची माहिती जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत दिली होती.

गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रह प्रक्षेपणाबरोबर अंतराळातील कचरा देखील वाढत असून हा कचरा चिंतेचे कारण ठरत आहे. सध्या कार्यरत असलेल्या उपग्रहांची संख्या दोन हजार आहे. तर पाच हजार उपग्रहांचा कार्यकाळ संपलेला आहे. कार्यकाळ संपेलेले उपग्रह हे पृथ्वीभोवती भ्रमण करत आहेत. या उपग्रहांसह अंतराळात १० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे सुमारे ३४ हजार तुकडे प्रति सेकंद ७ ते ८ किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत.

अंतराळातील वाढता कचरा हा नवीन मोहिमांसह अंतराळस्थानक व त्यात रहाणार्‍यांना धोक्याचा ठरत आहे. त्यामुळे अंतराळातील हा कचरा नष्ट करण्यासाठी इस्रोतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेने आणि ‘इंटर-एजन्सी स्पेस डेब्रीज कॉर्डिनेशन’ समितीने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

अंतराळातील कचरा काढण्यासाठी संशोधन आणि विकासकार्य हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक मोहिमेनंतर उपग्रह, रॉकेट यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना सुरक्षितरित्या कक्षेच्या बाहेर घेण्यात येत असते. इस्रोच्या अंतराळ मोहिमेनंतर कचरा नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत असते. एखाद्या मोहिमेनंतर अंतराळात रॉकेटच्या कव्हरसह अन्य काही भाग तसेच रहातात. हे भाग पृथ्वीच्या खालच्या कक्षेेत आणण्यात येतात. त्यानंतर पुढील २० वर्षात हे भाग पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्याने घर्षणामुळे नष्ट होतात, असे सिंग म्हणाले.

गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक त्याच्या कक्षेपासून ३ मिनिटांसाठी ३१० मीटरवर हलविण्यात आले होते. अमेरिकेच्या प्रक्षेपण योजनाची आणि स्थानकाची होणारी संभाव्य टक्कर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये रशियाने उपग्रहविरोधी मोहीम हाती घेतली होती. यावेळी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. हा कचरा अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो, असे सिंग म्हणाले.

leave a reply