देशातील पहिली ‘किसान ट्रेन’ सुरू

नाशिक – भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या वाहतुकीसाठी देशातली पहिली ‘किसान रेल्वे’ सेवा शुक्रवारपासून सुरु झाली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे या गाडीला हिरवा कंदील दाखविला. सध्या ही ‘किसान ट्रेन’ नाशिकजवळच्या देवळाली ते बिहारच्या दानापूर स्थानकापर्यंत आठवड्यातून एकदा धावणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या वर्षीच्या अर्थसंंकल्पात नाशिवंत मालाच्या वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने पूर्णपणे वातानुकुलित अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली होती. यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेमधून शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत वातानुकुलित वातावरणात मालाची ने-आण केली जाईल. अशा रेल्वेमुळे शेतकर्‍यांना त्यांचा नाशिवंत माल बाजारपेठेपर्यंत नेऊन चांगला लाभ कमविता येईल.

देवळाली स्थानकातून सकाळी अकरा वाजता ‘किसान रेल्वे’ ट्रेन सुटली. ही ट्रेन १,५१९ किमीचे अंतर ३१ तास ४५ मिनिटांत पार करून शनिवारी संध्याकाळी पावणेसात वाजता बिहारच्या दानापूर स्थानकात दाखल होईल. या मार्गात नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुर्हाणपूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय नगर व बक्सर या ठिकाणी थांबा घेऊन दानापूरला पोहोचेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे.

पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप (PPP) द्वारे कोल्ड चेन आणि शेतमालाची वाहतूक व विक्री करण्याची ही सेवा असणार आहे. नाशिक जिल्हा आणि परिसरात ताज्या भाज्या, फळे, फुले, कांदे व अन्य नाशिवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना हा परिसर ‘किचन गार्डन’ म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरांखेरीज अन्य राज्यांमध्ये पाटणा, अलाहाबाद, कटनी, सतना इत्यादी ठिकाणी पाठविता येणार आहे.

याआधी रेल्वने केळ्यांच्या वाहतुकीसाठी विशेष गाडी चालवीली होती. मात्र विविध प्रकारच्या नाशवंत मालांसाठी एकत्रित अशी गाडी प्रथमच चालविण्यात येत आहे. या रेल्वेद्वारे अन्नधान्य, भाजीपाला व फळे यांची वाहतूक योग्य पद्धतीने करण्याची सोय केली जाणार आहे. या ट्रेनशिवाय ‘कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (सीसीआय) ‘सीएसआर’ निधीतून उत्तर प्रदेशाच्या ‘गाझीपूर घाट’ व ‘राजा का तालाब’ आणि दिल्लीत ‘न्यू आझादपूर’ येथे नाशिवंत मालासाठी ‘कार्गो सेंटर’ सुरु केली आहेत. नशिक जिल्ह्यात लासलगाव येथेही अशीच योजना प्रगतीपथावर आहे.

leave a reply