कोरोनाच्या साथीचे दुसरे वर्ष पूर्वीपेक्षा अधिक भयावह ठरेल – जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा

जीनिव्हा – ‘कोरोनाच्या साथीने आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. साथीचे दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक घातक व भयावह ठरेल’, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांनी दिला. यावेळी त्यांनी आशिया, लॅटिन अमेरिका व आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण तसेच बळींची संख्या वाढत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचवेळी साथीच्या तडाख्यातून बाहेर पडायचे असेल तर आरोग्यविषयक उपाययोजना व लसीकरण या दोन्हींची आवश्यकता आहे, असा दावाही आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केला.

जागतिक आरोग्य संघटन२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात १६ कोटींहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या ३३ लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवनवीन ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे अमेरिका व युरोपातील काही देश साथ रोखण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध हळुहळू मागे घेत आहेत. त्याचवेळी आशियातील काही देशांमध्ये कोरोना साथीचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्याने आणीबाणी तसेच लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. जपानमध्ये यावर्षी होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेवरही साथीचे तीव्र सावट असून, स्थानिक पातळीवर स्पर्धा रद्द करण्याची मागणी तीव्र झाली आहे. लॅटिन अमेरिकेतील काही देशांमध्ये अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून, गेल्या आठवड्यात कोरोनामुळे जगभरात गेलेल्या बळींपैकी ४० टक्के बळी लॅटिन अमेरिकेतील असल्याची माहिती डॉ. टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या प्रमुखांनी यावेळी लसीकरणाबाबत श्रीमंत देशांकडून राबविण्यात येणार्‍या धोरणावरही नाराजी व्यक्त केली. देशातील विविध वयोगटाच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्याऐवजी गरीब व अविकसित देशांमधील जनतेला पुरेसा पुरवठा होईल, यावर भर द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अल्प उत्पन्न देशांना गरजेच्या फक्त ०.३ टक्के इतकाच लसींचा पुरवठा झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’च्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. नव्या स्ट्रेनच्या वाढत्या फैलावामुळे अर्थव्यवस्था व दैनंदिन व्यवहार पुन्हा खुले करण्याची योजना कोलमडू शकते, असा इशारा पंतप्रधान जॉन्सन यांनी दिला. ब्रिटनची राजधानी लंडन तसेच इतर भागात या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्यानंतर जॉन्सन यांनी हे वक्तव्य केले आहे.

leave a reply