आर्क्टिक क्षेत्रात रशिया व चीनला रोखण्याची क्षमता अमेरिकेकडे नाही – अमेरिकी विश्‍लेषकाचा इशारा

वॉशिंग्टन – आर्क्टिक क्षेत्रात रशिया व चीनचा धोका वाढत असून तो रोखण्याची क्षमता अमेरिकेकडे नसल्याचा इशारा विश्‍लेषक निक सोल्हेम यांनी दिला. आर्क्टिकवर वर्चस्व मिळविण्यासाठी रशिया तसेच चीनने गेल्या काही वर्षात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या तुलनेत अमेरिका किमान दशकभर तरी मागे असल्याचा दावाही सोल्हेम यांनी केला. अमेरिकी विश्‍लेषकांचा इशारा समोर येत असतानाच, रशियाकडून आर्क्टिकमध्ये उभारण्यात येणार्‍या एका महत्त्वाकांक्षी ऊर्जा प्रकल्पात चीन सहभागी होऊ शकतो, अशी माहिती रशियन अधिकार्‍यांनी दिली आहे.

पृथ्वीच्या उत्तर धु्रवानजिक असणारे बर्फाच्छादित क्षेत्र म्हणून ओळख असणार्‍या आर्क्टिकमधील हिमनग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वितळत आहे. त्यामुळे या भागात लवकरच नवा व्यापारी मार्ग तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी या भागात मोठ्या प्रमाणात इंधन व खनिजे असल्याचा दावा करण्यात आला असून त्यासाठी जगातील अनेक देश उत्सुक असल्याचे समोर आले आहे. रशियाने यासाठी पुढाकार घेऊन आक्रमक हालचाली सुरू केल्या असून त्यापाठोपाठ आता चीननेही त्यात रस घेण्यास सुरुवात केली आहे.

२०१८ साली चीनने स्वतंत्र धोरण जाहीर करून आपण ‘निअर आर्क्टिक स्टेट’ असल्याची घोषणाही केली होती. चीनने रशियाच्या सहकार्याने आर्क्टिकमधील काही प्रकल्पांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. त्याचवेळी संशोधन व व्यापाराचे कारण पुढे करून चीनने आर्क्टिकमधील दळणवळणसाठी आवश्यक असणारी ‘आईसब्रेकर’ प्रकारातील तीन जहाजेही सक्रिय केली आहेत. आर्क्टिक क्षेत्राचा भाग असणार्‍या युरोपिय देशांमध्येही चीनची गुंतवणूक सुरू असून नॉर्वेतील एका एअरलाईन्स कंपनीवर ताबा मिळविण्यात चीनला यश आले आहे. तर रशियाने आर्क्टिकवर उघड दावा सांगून मोठ्या प्रमाणात संरक्षणतळ तसेच इंधन व ऊर्जा प्रकल्प कार्यरत केले आहेत.

या सर्व पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेकडे फक्त दोन ‘आईसब्रेकर’ जहाजे कार्यरत असून ग्रीनलॅण्डमध्ये सक्रिय संरक्षणतळ आहे. मात्र चीन व रशियाचा वाढता धोका लक्षात घेता या गोष्टी आर्क्टिकच्या सुरक्षेसाठी पुरेशा नाहीत, याची जाणीव अमेरिकी विश्‍लेषक सोल्हेम यांनी करून दिली. ‘आर्क्टिकसाठी लागणार्‍या क्षमतांचा विचार करता अमेरिका रशिया व चीनपेक्षा किमान १० वर्षे मागे आहे. पूर्ण क्षमतेचा विचार केला तर कदाचित २० वर्षेही असू शकतो’, असे सोल्हेम यांनी बजावले.

गेल्याच महिन्यात आर्क्टिकचा भाग असणार्‍या अमेरिकेच्या अलास्का प्रांताचे गव्हर्नर माईक डनलेवी यांनीही रशिया व चीनच्या धोक्यकडे लक्ष वेधले होते. आर्क्टिक या दोन देशांच्या नियंत्रणाखाली येऊ नये, म्हणून अमेरिकी प्रशासनाने आताच धोरणात्मक पावले उचलावीत, असा सल्लाही डनलेवी यांनी दिला होता.

दरम्यान, रशिया आर्क्टिकमध्ये ‘स्नोफ्लेक इंटरनॅशनल आर्क्टिक स्टेशन’ नावाचा भव्य ऊर्जा प्रकल्प उभारीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी चीन उत्सुक असल्याची माहिती रशियन अधिकार्‍यांनी दिली. यापूर्वी दक्षिण कोरियानेही सदर प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

leave a reply