अमेरिकी इंधनकंपनी ‘कोलोनिअल’वरील सायबरहल्ल्यामागे ‘सीआयए’चा हात – रशियन सायबरसुरक्षा कंपनीच्या माजी प्रमुखांचा दावा

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकी इंधनकंपनी कोलोनिअलवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे, गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चाच हात असावा असा खळबळजनक दावा रशियातील सायबरसुरक्षा कंपनीच्या माजी प्रमुखांनी केला आहे. ‘कॅस्परस्की लॅब’ या कंपनीच्या संस्थापक व माजी प्रमुख नताल्या कॅस्परस्की यांनी एका मुलाखतीत हा दावा केला. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ने तयार केलेल्या ‘अम्ब्रेज’ या हॅकर्सच्या गटानेच ‘कोलोनिअल पाईपलाईन’वर सायबरहल्ला केला असावा, असे नताल्या कॅस्परस्की यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

शुक्रवारी ‘रिअ नोवोस्ती’ या रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, कॅस्परस्की यांनी कोलोनिअलवर झालेला हल्ला रशियातून झाला असण्याची शक्यताही फेटाळून लावली. ‘अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएने उम्ब्रेज नावाचा हॅकर्सचा गट बनविला आहे. हा गट परदेशातील हॅकर्सच्या गटांप्रमाणे काम करु शकतो. हल्ला केल्यानंतर त्याची संपूर्ण पार्श्‍वभूमी लपवून ठेवण्याची क्षमता या गटाकडे आहे. या गटाकडे रशिया, उत्तर कोरिया, चीन व इराण यासारख्या देशांमधील हॅकर्सच्या गटांप्रमाणे काम करण्याची क्षमता आहे’, असा दावा ‘कॅस्परस्की लॅब’च्या माजी प्रमुख नताल्या कॅस्परस्की यांनी केला.

अमेरिकेतील नेटवर्कवर झालेल्या सायबरहल्ल्यामागे ‘सीआयए’चाच हात असल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. २०१७ साली विकिलिक्सच्या कागदपत्रांमधून या गटासंदर्भातील माहिती उघड झाली होती. अमेरिकी माध्यमांनीही या गटाची दखल घेताना सदर गट रशियन हॅकर्सप्रमाणे सायबरहल्ले करु शकतो, असे म्हटले होते.

गेल्या शुक्रवारी कोलोनिअल पाईपलाईनवर ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ला चढविण्यात आला होता. या सायबरहल्ल्यानंतर कंपनीने आपली पाईपलाईन व इंधनपुरवठा पूर्णपणे बंद केला होता. हल्ल्यामागे रशियाशी संबंधित असणार्‍या ‘डार्कसाईड’ या हॅकर्सच्या गटाचा हात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अमेरिकी कंपनीने सदर गटाला ५० लाख डॉलर्सहून अधिक खंडणी दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर रशियन सायबरकंपनीच्या माजी प्रमुखांनी केलेला दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, कोलोनिअलने आपले व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा केला असला तरी अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये इंधनाची टंचाई निर्माण झाल्याचे समोर आले आहे. राजधानी वॉशिंग्टनमधील अनेक पेट्रोलपंपांवर इंधनाचा साठा संपल्याची माहिती स्थानिक वेबसाईट्सनी दिली आहे. व्हर्जिनिआ प्रांतासह काही राज्यांमध्ये इंधनाचे दरही वाढले असून पेट्रोलपंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.

कोलोनिअल सायबरहल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पार्टीने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या इंधनविषयक धोरणांवर जोरदार हल्ला चढविला आहे. बायडेन यांची धोरणे अमेरिकी अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करीत असून, येणार्‍या दिवसांमध्ये अमेरिकेवर इंधन आयात करण्याची वेळ ओढविणार असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे नेते स्टिव्ह स्कॅलिस यांनी केला आहे.

leave a reply