अमेरिकेच्या पोलंडमधील संभाव्य अण्वस्त्रतैनातीवर रशियाचे टीकास्त्र

मॉस्को, (वृत्तसंस्था) – अमेरिकेची जर्मनीतील अण्वस्त्रे पोलंडमध्ये तैनात करण्याच्या मुद्यावर रशियाने टीकास्त्र सोडले आहे. पोलंडमधील संभाव्य अण्वस्त्र तैनाती रशिया-नाटो कराराचे उघड उल्लंघन ठरते, अशी टीका रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅवरोव्ह यांनी केली.  अमेरिकेने जर्मनीतील तळावर १५ ते २० अण्वस्त्रे तैनात केली असून ती हटविण्याची मागणी जर्मनीतील राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

‘अमेरिका जर्मनीतील आपली अण्वस्त्रे पोलंडमध्ये तैनात करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते नाटो-रशिया कराराचे थेट उल्लंघन ठरेल. या कराराद्वारे नाटोने नव्या सदस्य देशांच्या भागात अण्वस्त्रे तैनात करण्यात येणार नाहीत, अशी हमी दिली होती. याचे पालन होते का नाही याबद्दल आता शंका आहे’, अशा शब्दात रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅवरोव्ह यांनी अमेरिकेच्या अण्वस्त्रतैनातीवर नाराजी व्यक्त केली.

जर्मनीतील सत्ताधारी आघाडीचा भाग असणाऱ्या ‘एसपीडी’ व ‘ग्रीन्स’ या दोन पक्षांनी देशातील अमेरिकेची अण्वस्त्रे काढून टाकण्याची मागणी केली आहे. या मागणीवर प्रतिक्रिया देताना, अमेरिकेने जर्मन सरकारला ठाम भूमिका घेण्याबाबत बजावले आहे. जर्मनीतील अमेरिकेचे राजदूत रिचर्ड ग्रेनेल यांनी एक लेख लिहून जर्मन सरकारकडे खुलासा मागितला आहे.

ग्रेनेल यांचा लेख सोशल मीडियावर पोस्ट करताना अमेरिकेच्या पोलंडमधील राजदूत जॉर्जेट मोसबॅकर यांनी, पोलंड अमेरिकेची अण्वस्त्रे आपल्याकडे तैनात करण्यास तयार असल्याचा दावा केला होता. पोलंड नाटोतील भूमिका योग्य रीतीने पार पाडत असून त्याला धोक्यांचीही जाणीव आहे, असेही मोसबॅकर यांनी म्हटले आहे. अमेरिकी राजदूतांच्या या वक्तव्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया आल्याचे परराष्ट्रमंत्र्यांच्या टिकेवरून दिसून येते.

अमेरिकेने युरोपातील पाच देशांमध्ये १५० हून अधिक अण्वस्त्रे तैनात केली असून त्यात जर्मनीव्यतिरिक्त इटली, बेल्जियम, नेदरलँड व तुर्कीचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या अण्वस्त्रविषयक धोरणात युरोपातील अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जर्मनीच्या राजकीय वर्तुळातून अमेरिकी अण्वस्त्रे हटविण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

leave a reply