लडाखमधील सीमेवर भारत चीनमधील तणाव अधिकच वाढला

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – लडाखमधील गलवान नदी खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणाव अधिकच वाढला आहे. चीनच्या जवानांनी  गलवान नदी क्षेत्रात तंबू ठोकले होते व येथील आपली तैनाती वाढविली होती. त्यानंतर भारतीय सैनिकांनीही या भागात तंबू ठोकले आहेत. तसेच दोन्ही देशांच्या सैनिकांनी बॅनर झळकावून या भागातून माघार घेण्याचा सल्ला एकमेकांना दिला आहे. याशिवाय पॅगोंग सरोवराच्या क्षेत्रात चीनने अधिक गस्ती नौका तैनात केल्याचे वृत्त आहे. भारतानेही या सरोवराच्या पश्चिमी भागात आपल्या नौका सज्ज ठेवल्या आहेत.

५ मे रोजी लडाखमध्ये चिनी हेलिकॉप्टर्सनी केलेला घुसखोरी प्रयत्न भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी येथे गस्त घालून उधळला होता. तसेच  त्यानंतर पॅगोंग सरोवर क्षेत्रात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठी झटपट झाली होती. येथे घुसखोरी केलेल्या चिनी जवानांना  भारतीय सैनिकांनी माघार घेण्यास भाग पाडले होते. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरदार झटपट झाली होती. त्यानंतर लडाखमधील तणाव सतत वाढत आहे. 

भारत या भागात करीत असलेल्या रस्त्याच्या बांधकामावर चीनने आक्षेप घेतला आहे. तसेच भारतानेच या क्षेत्रात घुसखोरी केल्याचा उलटा आरोप चीनने लगावला आहे. मात्र  गलवान नदी क्षेत्रात चिनी सैनिकांनी ठोकलेल्या तंबूवर आणि डेमचॉकमध्ये सीमेनजीक आपल्या बांधकामावर चीनने चकार शब्द उच्चरलेला नाही. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समधून हे आरोप करण्यात आले होते. तसेच २०१७ साली डोकलाममध्ये निर्माण झाली तशी स्थिती येथे निर्माण  होणार नाही, अशी अपेक्षाही ग्लोबल टाईम्समधून व्यक्त करण्यात आली आहे. 

मात्र प्रत्यक्षात चीनने लडाख आपली तैनाती वाढविली आहे. १९६२च्या चीन-भारत युद्धाआधी चिनी जवानांनी ज्या भागात आपले तंबू ठोकले होते. त्या भागात यावेळीही चिनी सैनिकांनी तंबू ठोकले आहेत. येथे चीनने जवानांची तैनाती मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. यानंतर भारताने येथे आपल्या सैनिकांच्या तैनातीत वाढ केली आहे. गलवान नदीच्या खोऱ्यात सध्या दोन्ही देशांच्या सैनिकांनी तंबू ठोकले आहेत.  येथे दोन्ही बाजूने येथून माघारी जाण्याचे बॅनर झळकविण्यात येत आहेत. 

लडाखमधे गलवान खोऱ्याबरोबर  पॅनगोंग सरोवर आणि डेमचॉकमधेही सैनिकांची तैनाती वाढली आहे.  पॅनगोंग  सरोवराच्या भागात चीनने गस्ती नौकांची तैनाती वाढविली आहे. याच भागात ५ मी रोजी दोन्ही देशांचे सैनिकांमध्ये झटपट झाली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे वृत्त आहे.