जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या सव्वातीन लाखांवर

-कोरोनाबाधितांची संख्या ५० लाखांवर

बाल्टिमोर, दि. २० (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोनाव्हायरसमुळे  दगावलेल्यांची संख्या सव्वातीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये या साथीने सर्वाधिक रुग्णांचे बळी घेतले आहेत. बुधवार संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या ५० लाखांच्याही पुढे गेली आहे. यापैकी जवळपास वीस लाख रुग्ण या साथीतून बरे झाल्याची दिलासादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, कोरोनामुळे जगभरात झालेल्या मृत्यूच्या थैमानाला चीन जबाबदार असल्याचा आरोप पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे जगभरात पाच हजाराहून अधिक जण दगावले आहेत. यामध्ये अमेरिकेतील पंधराशेहून अधिक रुग्णांचा समावेश असून या देशातील कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ९३ हजारावर पोहोचली आहे. तर ब्राझिलमध्ये या साथीमुळे एकाच दिवसात १,१६३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली. याबरोबर ब्राझिलमध्ये या साथीने दगावलेल्याची एकूण संख्या १८,१२१ वर गेली आहे. युरोपमध्ये या साथीचा मृत्यूदर कमी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

तर, जगभरात चोवीस तासात या साथीचे ९५ हजाराहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. यापैकी अमेरिकेत २२ हजार, युरोपात २० हजार, ब्राझिलमध्ये १८,८४८ तर रशियात नऊ हजार  नव्या रुग्णांची एका दिवसात नोंद झाली आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १५,७०,०००च्या पुढे गेली आहे. तर रशियामध्ये या साथीची लागण झालेल्यांची एकूण संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. ब्राझिलमध्ये या साथीचे पावणेतीन लाख रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या स्थितीसाठी चीनला जबाबदार धरले आहे. ‘लाखोजणांचा बळी घेणाऱ्या कोरोनाव्हायरससाठी  चीन वगळता जगभरातील प्रत्येक देश जबाबदार असल्याचा, दावा चीनमधील एका बेअक्कल व्यक्तीने केला आहे. पण चीनच्या अक्षमतेमुळे  जगाला या मृत्यूच्या थैमानाला सामोरे जावे लागत आहे’, असा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत अमेरिकेने केलेले आरोप चीनने फेटाळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा ठपका ठेवला.

अमेरिकेसह  इतर देशांनी  या साथीबाबत चीनवर केलेल्या गंभीर आरोपांचे परिणाम दिसू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका बैठकीत चीनला देखील या साथीची सखोल चौकशी झालीच पाहिजे, या मागणीला दुजोरा देणे भाग पडले होते. आपल्या विरोधात सर्वच प्रमुख देशांची झालेली एकजूट पाहता चीनने या आघाडीवर नरमाईचे धोरण पत्करल्याचे, यामुळे स्पष्ट झाले आहे.

leave a reply