क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियाचे नवे पंतप्रधान बनले

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानरियाध – सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझिझ अल सौद यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची घोषणा केली. याआधीच क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्याकडेच सौदीची सारी सूत्रे एकवटलेली आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदावर आरूढ होऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सौदीच्या अंतर्गत राजकारणाला निराळेच वळण देण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. याचे परिणाम दिसू लागले असून यामुळे सौदीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

एमबीएस म्हणून आखातासह जगभरातील माध्यमांमध्ये ख्यातनाम असलेले प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडेच खऱ्या अर्थाने सौदीची सत्तासूत्रे आहेत. सौदीची ध्ययेधोरणे व दिशा ठरविण्याचे पूर्णाधिकार हाती असलेल्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीसाठी व्हिजन 2030ची घोषणा केली होती. यामध्ये इंधनाच्या निर्यातीवर अवलंबून असलेली सौदीची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून अर्थव्यवस्थेचे नवे आधार उभे करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आलेले आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याबरोबरच आधुनिक समाजाच्या निर्मितीलाही चालना देण्याचे ध्येय प्रिन्स मोहम्मद यांनी समोर ठेवले आहे. तसेच महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याबरोबरच इतर सामाजिक सुधारणांसाठी प्रिन्स मोहम्मद यांनी पुढाकार घेतला. सौदीसारख्या परंपरावादी देशात त्यांनी घडवून आणलेले हे बदल लक्षणीय ठरले होते.

तसेच सौदीच्या परराष्ट्र धोरणातही प्रिन्स मोहम्मद यांनी फार मोठे बदल करून सौदीची संरक्षणसिद्धता वाढविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संरक्षणाच्या आघाडीवरील स्वयंपूर्णता विकसित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून संरक्षणसाहित्याच्या आघाडीवर अवघे दोन टक्के इतक्या प्रमाणात स्वयंपूर्ण असलेल्या सौदीला त्यांनी 15 टक्के इतक्या स्वयंपूर्णतेपर्यंत आणून ठेवले आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणारा देश ही सौदीची ओळख पुसून टाकण्याची तयारीही प्रिन्स मोहम्मद यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदीला भेट दिली होती. त्यावेळी बायडेन यांना ‘रेड कार्पेट’ स्वागत करण्याचे नाकारण्याचे धाडस प्रिन्स मोहम्मद यांनी दाखविले. तसेच बायडेन यांनी केलेल्या मागणीनुसार इंधनाचे उत्पादन वाढविण्यासही प्रिन्स मोहम्मद यांनी नकार दिला होता. बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर सौदी व प्रिन्स मोहम्मद यांना लक्ष्य करणारे काही निर्णय घेतले होते. त्यावर प्रिन्स मोहम्मद यांनी दिलेली प्रतिक्र्रिया होती, असे बोलले जाते.

इस्रायल हा सौदीचा शत्रू नसल्याचे सांगून प्रिन्स मोहम्मद यांनी पुढच्या काळात इस्रायलशीही सहकार्य शक्य असल्याचे संकेत दिले होते. अशी भूमिका स्वीकारून सौदीला नवी दिशा देणारे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आता पंतप्रधान बनत आहेत. यामुळे ते सौदीचा कारभार अधिक प्रभावीपणे चालवू शकतील. यासाठी आता राजे सलमान यांच्या उपस्थिती व आदेशांची आवश्यकता राहणार नाही. पंतप्रधान या नात्याने प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आता महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेऊ शकतात.

प्रिन्स मोहम्मद यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्याबरोबर राजे सलमान यांनी आपल्या अन्य दोन मुलांना देखील महत्त्वाची पदे दिली आहेत. सौदीचे उपसंरक्षणमंत्री असलेले प्रिन्स खालिद बिन सलमान यांना संरक्षणमंत्रीपदी बढती मिळाली. तर प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान यांच्याकडे सौदीच्या ऊर्जाविभागाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. तर परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद आणि अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आले आहे.

leave a reply