भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा

चर्चावॉशिंग्टन – अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी चर्चा केली. आधीच्या तुलनेत भारत व अमेरिकेचे संबंध अधिकाधिक विकसित होत असल्याचे सांगून जयशंकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी दोन हजार डॉलर्स इतके दरडोई उत्पन्न असलेल्या भारताची अवस्था इंधन दरवाढीमुळे बिकट बनल्याची जाणीव जयशंकर यांनी अमेरिकेला करून दिली आहे. त्याचवेळी भारताच्या लोकशाहीला दुसऱ्या कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे जयशंकर यांनी खडसावले आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला एफ-16 लढाऊ विमानांसाठी दिलेले 45 कोटी डॉलर्सच्या पॅकेजवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कडक शब्दात आक्षेप नोंदविला होता. त्यावर अमेरिकेने सारवासारव करून भारताबरोबरील आपले सहकार्याला फार मोठे महत्त्व असल्याचे स्पष्ट केले होते. परराष्ट्रमंत्री जयशंकर व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यातील चर्चेत तसेच संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांच्या धोरणात्मक पातळीवरील सहकार्यावर विशेष भर देण्यात आला. दोन्ही देशांच्या सहकार्याचा आलेख उंचावत असल्याचे सांगून जयशंकर यांनी यावेळी त्यावर समाधान व्यक्त केले.

तर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी आपली युक्रेनचे युद्ध, या युद्धाचे परिणाम, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती, दक्षिण आशिया आणि आखाती क्षेत्रातील उलथापालथींवर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. तसेच आर्थिक पातळीवर जगभरात सुरू असलेल्या चढउतारांवरही यावेळी विचारविनिमय झाल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांसह संयुक्त पत्रकार परिषद संबोधित करताना, जयशंकर यांनी भारताच्या लोकशाहीचा दर्जा निर्धारित करण्याचा अधिकार दुसऱ्या कुणालाही नसल्याचे स्पष्टपणे बजावले. भारताच्या लोकशाहीवरून अमेरिकेत केल्या जाणाऱ्या शेरेबाजीला उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

याआधी अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित करताना, अमेरिकेतील काही वर्तमानपत्रे भारताकडे आकसबुद्धीने पाहत असल्याचा ठपका जयशंकर यांनी ठेवला होता. भारताबाहेर राहून भारताची दिशा निश्चित करण्याचे प्रयत्न करू पाहणाऱ्यांना सध्या अपयश मिळत आहे. यातून आलेल्या वैफल्यातून ते भारतावर एकांगी टीका करीत असल्याचे जयशंकर यांनी फटकारले होते.

leave a reply