अमेरिकी डॉलर दोन दशकांमधील उच्चांकी पातळीवर

- युआनच्या ऐतिहासिक घसरणीसह युरो व ब्रिटीश पौंडचे मूल्यही खाली आले

उच्चांकी पातळीवरवॉशिंग्टन – अमेरिकन डॉलर गेल्या वीस वर्षातील सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तर डॉलरच्या तुलनेत चीनचे चलन युआनने तळ गाठला असून युआन सर्वाधिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. जगातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांच्या चलनामध्ये नोंदविण्यात आलेले हे बदल लक्षणीय ठरतात. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ व पुढच्या काळातही व्याजदरवाढीचे संकेत दिल्याने, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी डॉलरकडे मोर्चा वळविल्याचे दिसते. ब्रिटीश पौंड, युरो व जपानी येनच्या चलनाचे मूल्यही यामुळे घसरले आहे. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्येही उमटले असून आशिया व युरोपमधील निर्देशांक एक ते तीन टक्क्यांनी आपटले आहेत.

उच्चांकी पातळीवरअमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये महागाईचा विक्रमी भडका उडाला आहे. हा भडका रोखण्यासाठी अमेरिकेसह बहुतांश मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करण्याचे सत्र सुरू केले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने गेल्या पाच महिन्यात चारवेळा व्याजदरात वाढ केली. पण त्यानंतरही महागाईचा दर कमी झालेला नाही. असे असले तरी महागाई रोखण्यासाठी व्याजदरातील वाढ हेच प्रमुख शस्त्र असल्याचे मध्यवर्ती बँकांकडून ठासून सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी नव्या दरवाढीची घोषणा करताना अमेरिकेत पुढील काही महिने व्याजदरातील वाढ कायम राहिल, असे बजावले होते.

त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता व अस्वस्थता असून त्यांनी आपला मोर्चा अमेरिकी डॉलरकडे वळविला आहे. बुधवारी अमेरिकी चलन असणाऱ्या डॉलरचे मूल्य उसळून दोन दशकांमधील उच्चांकी स्तरावर पोहोचले. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये डॉलर इंडेक्स 0.5 टक्क्यांनी वाढून 114.78पर्यंत पोहोचला. अमेरिकी डॉलर मजबूत होत असतानाच जगातील इतर प्रमुख चलनांना घसरणीचा सामना करावा लागला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या युआनचे मूल्य 12 वर्षातील नीचांकी स्तरावर आले. बुधवारी झालेल्या व्यवहारांमध्ये एका डॉलरसाठी तब्बल 7.2386 युआन मोजावे लागत होते. चीनने युआन चलन आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल केल्यानंतची ही ऐतिहासिक घसरण ठरली आहे.

उच्चांकी पातळीवरयुआनबरोबरच जपानचा येन तसेच भारतीय रुपयातही घसरणीची नोंद झाली. एका अमेरिकी डॉलरसाठी 144.7750 जपानी येन अशा पातळीवर बुधवारी व्यवहारांची नोंद झाली. गेल्या आठवड्यात जपानी येनने डॉलरविरोधात 145चा स्तर ओलांडल्याने जपानच्या मध्यवर्ती बँकेला हस्तक्षेप करणे भाग पडले होते. युरोपिय देशांचे ‘युरो’ चलन तसेच ब्रिटनच्या पौंड स्टर्लिंगच्या मूल्यातही घसरण झाली. एका डॉलरमागे 0.955 युरो ही दोन दशकांमधील नीचांकी पातळी ठरली आहे. तर ब्रिटीश पौंड 1.032 पर्यंत खाली आल्याची माहिती देण्यात आली. युरो तसेच ब्रिटीश पौंडाची घसरण पुढील काही काळ चालू राहिल, असे भाकित विश्लेषकांनी वर्तविले आहे.

चलनांमधील घसरणीचे पडसाद आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्येही उमटले. युरोप तसेच आशियामधील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक ते तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. काही निर्देशांक वर्षातील नीचांकी स्तरापर्यंत आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

leave a reply