माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात सीआरपीएफ नवे हेलिपॅडस्‌‍ उभारणार

नवी दिल्ली – माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात रात्रीच्यावेळी हॅलिकॉप्टर्सची लँडिंग व टेकऑफ शक्य असलेल्या हेलिपॅडच्या संख्या वाढविण्यावर सीआरपीएफ विचार करीत आहे. माओवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रात सुरू असलेली मोहीम, यामध्ये जखमी होणारे जवान व जखमी जवानांना वेळेवर मदत पुरविण्याकरिता येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून नवी हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत.

माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात सीआरपीएफ नवे हेलिपॅडस्‌‍ उभारणारमाओवाद्यांविरोधातील कारवाई गेल्या काही वर्षात अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यासाठी माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या भागातील जवानांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. माओवाद्यांविरोधात मोहिमेत सीआरपीएफचे सुमारे 1.20 लाख जवान तैनात आहेत. सीआरपीएफचे जवान कोब्रा बटालियनसह अन्य दलांसह माओवाद्यांविरोधात लढत आहेत.

माओवाद्यांविरोधातील या मोहिमेमुळे माओवाद्यांचे प्रभाव असलेल्या जिल्ह्याची संख्या गेल्या चार ते पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहेे. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन 126 वरून 70 वर आली आहे.

मात्र रात्रीच्यावेळी घनदाट जंगलात माओवादी आणि सुरक्षादलांच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत किंवा आयईडी स्फोटात जवान जखमी झाल्यास जवानांना रुग्यालयात घेऊन जाताना अडचणी येतात. जखमी जवानांना वेळेत उपचार मिळाल्यास पुढील गुंतागूंत टळू शकते.

पण काहीवेळा तांत्रिक कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाणाला विलंब होतो. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी हवामान आणि नैसर्गिक प्रकाश खूपच महत्त्वाचा असतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी हेलिकॉप्टर्स लँडिग व उड्डाण घेऊ शकणाऱ्या हेलिपॅडच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये बिहारच्या गया जिल्ह्यात कोब्रा बटालियनचा जवान आयईडी स्फोटात जखमी झाला होता. या जवानाला सात तासानंतर उपचार मिळाले. या जवानाला पाय गमवाला लागला. त्याला वेळीच उपचार मिळाले असते तर चित्र वेगळे असते. या सर्वाचा विचार करता रात्रीच्या वेळी देखील उड्डाण व लँडिंग करू शकणाऱ्या हेलिपॅडची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच यामुळे सुरक्षादलांच्या माओवाद्यांविरोधातील कारवाईची क्षमताही वाढणार आहे.

गडचिरोलीत 20 लाखांचे इनाम असलेल्या माओवाद्यांचे आत्मसमर्पण

महाराष्ट्रात दोन माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या दोन माओवाद्यांवर अनेक गुन्ह्यांची नोंद असून 20 लाखांचे इनाम होते. छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांवर घात लावून झालेल्या 6 पेक्षा जास्त हल्ल्यांमध्येही माओवाद्यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये एकूण 31 पोलिसांचा बळी गेला होता, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.

दीपक उर्फ मुनशी रामसू इस्तम आणि त्याची पत्नी शाम्बत्ती नेवारु अलम अशी या दोन शरण आलेल्या माओवाद्यांची नावे आहेत. दीपक हा मूळचा गडचिरोलीतील इत्पाली तालुक्यातील रहिवाशी आहे. तर त्याची पत्नी छत्तीसगडच्या हिंडवाडामधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे दोघे माओवाद्यांच्या 21 नंबर प्लाटून कमांडचे सदस्य असून दीपकवर तीन हत्या, आठ चकमकीत सहभागी असल्याचा आरोप होता. तसेच या दोघांनी एकूण सहा हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये 31 पोलिसांचा बळी गेला आहे. दीपकवर 16 लाखांचे व त्याच्या पत्नीवर चार लाखांचे इनाम होते. आतापर्यंत गडचिरोलीत 649 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

leave a reply