रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलर्सवर पोहोचले

कच्च्या तेलाचे दरलंडन/न्यूयॉर्क – रशिया व युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी कच्च्या तेलाच्या दरांनी उसळी घेत प्रति बॅरलमागे ९५ डॉलर्सचा टप्पा ओलांडला. ऑक्टोबर २०१४ नंतर कच्च्या तेलाच्या दरांनी ९५ डॉलर्सची पातळी पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाचे दर या वर्षात १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतील, असे भाकित विश्‍लेषकांनी वर्तविले आहे.

शुक्रवारी लंडन तसेच अमेरिकेत झालेल्या व्यवहारांमध्ये कच्च्या तेलाच्या दरांनी चार टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. लंडनमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये ‘ब्रेंट क्रूड’ तेलाने ४.१४ टक्क्यांची उसळी घेऊन प्रति बॅरलमागे ९५.३७ डॉलर्सची नोंद केली. तर अमेरिकेत ‘डब्ल्यूटीआय’ प्रकारातील तेलाचे दर पाच टक्क्यांहून अधिक वाढत प्रति बॅरलमागे ९४.६६ डॉलर्सपर्यंत पोहोचले. कच्च्या तेलाच्या दरांनी या आठवड्यात उसळी घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने कच्च्या तेलासंदर्भात एक अहवाल सादर केला होता. त्यात २०२२ सालच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन १० कोटी बॅरल्सच्या वर पोहोचेल, असा दावा केला होता. या दाव्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांनी दोन टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर वाढताना दिसत आहेत.

कच्च्या तेलाचे दरशुक्रवारी कच्च्या तेलाच्या दरांनी उसळी घेण्यामागे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांचे वक्तव्य हा महत्त्वाचा घटक ठरल्याचे समोर आले आहे. सुलिवन यांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाची शक्यता व्यक्त करताना हे आक्रमण चीनमधील ऑलिंपिक स्पर्धा सुरू असतानाही होऊ शकते, असे बजावले होते. हे वक्तव्य रशिया-युक्रेन युद्धाची शक्यता अधिक वाढल्याचे संकेत देणारे ठरत असल्याने त्यावर बाजारपेठेतून प्रतिक्रिया उमटली व तेलाचे दर उसळले, याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

२०२१ साली कच्च्या तेलाच्या दरांमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर २०२२ सालच्या पहिल्या ४० दिवसांमध्येच कच्च्या तेलाचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर येत्या काही दिवसात कच्च्या तेलाचे दर २० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जातील, असे भाकित पॅवेल मोल्कानोव्ह या विश्‍लेषकाने वर्तविले आहे. ‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सौदी अरेबिया व अमेरिकेबरोबरच रशिया हा देश १० टक्के तेलाचा पुरवठा करतो. त्यातील ५० टक्के तेल युरोपला पुरविण्यात येते. रशिया युक्रेन युद्ध भडकल्यास या तेलाच्या पुरवठ्याला धोका आहे. यातून कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत उसळू शकतात व त्याचा फटका भारत, जर्मनी व फ्रान्ससारख्या देशांना बसू शकतो’, असे मोल्कानोव्ह यांनी बजावले.

विश्‍लेषक ट्रॉय व्हिन्सेंट यांनी ऐन युद्धाच्या कालावधीत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा दावा केला आहे.

leave a reply