‘डीआरडीओ’ने कोरोनावर तयार केलेल्या औषधाला ‘डीसीजीआय’ची मंजुरी

- ‘२-डीजी’ औषधामुळे रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरता कमी होत असल्याचे निष्कर्ष

‘डीसीजीआय’नवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढाईत ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) तयार केलेले ‘२-डीजी’ हे औषध मोठी कामगिरी बजावण्याची शक्यता आहे. देशात सध्या कोरोनाने दरदिवशी चार हजार बळी जात असताना आणि कित्येक रुग्णांना ऑक्सिजन चढविण्याची गरज भासत असताना ‘डीआरडीओ’ तयार केलेल्या औषधाच्या चाचण्यांचे अहवाल आशादायी ठरले आहेत. शनिवारी ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) ‘डीआरडीओ’ तयार केलेल्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच हे औषध बाजारात होईल. डॉ. रेड्डीज कंपनीला या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

देशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५ लाखांवर गेली असताना आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. कितीतरी रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांना बाहेरुन ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासत असल्याने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडाही भासत आहे. भारताचे मित्र देश मोठ्या प्रमाणावर भारताला ऑक्सिजन संयंत्र, ऑक्सिजन जनरेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सारख्या उपकरणांचा पुरवठा करीत आहे. तसेच भारतही बाहेरून मोठ्या प्रमाणांवर या उपकरणांची आयात करीत आहे. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. तरीसुद्धा कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे.

अशा वेळी डीआरडीओने ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ या (आयएनएमएएस) आपल्या प्रयोगशाळेत ‘२-डिऑक्सी-डी-ग्लूकोज’ (२-डीजी) नावाचे औषध कोरोनावरील उपचारासाठी विकसित केले आहे. तसेच डीआरडीओच्या हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ची (सीसीएमबी) हे औषध विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

‘डीसीजीआय’‘२-डीजी’ औषधांमुळे कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होतात. तसेच ऑक्सिजन चढवावे लागत असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनवरील निर्भरताही लवकर संपते, असे या औषधांच्या चाचण्यांमधून निष्कर्ष निघाले आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतच डीआरडीओने हे औषध विकसित करण्यास सुरुवात केली होती. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात या औषधाच्या प्रयोगशाळेत चाचण्या झाल्यानंतर पुढील चाचण्यांची परवानगी मागण्यात आली व मे महिन्यापासून या औषधाच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली. देशभरातील ११ रुग्णांलयांमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये या औषधांमुळे रुग्ण अडीच ते तीन दिवस आधी बरा होत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या मंजुरी मिळाली. डिसेंबर ते २०२१ च्या मार्च दरम्यान या औषधाच्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडूमधील एकूण २७ रुग्णालयांमध्ये पार पडल्या. यामध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर बाहेरुन ऑक्सिजन चढवावे लागलेल्या ४२ टक्के रुग्णांची ऑक्सिजनची गरज हे औषध दिल्याचर तिसर्‍या दिवशीच संपुष्टात आल्याचे लक्षात आले. यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध प्रभावी सिद्ध होईल, अशी अशा वाढली आहे.

कॅन्सरवर उपचारासाठी विकसित करीत असलेल्या औषधाचा वापर करून कोरोनावर उपचारासाठीचे हे औषध तयार करण्यात आले आहे. हे औषध पावडर स्वरुपात असून केवळ पाण्यात मिश्रित करून त्याचे सेवन करायचे असल्याची माहिती अधिकार्‍याने दिली. डीआरडीओच्या दाव्यानुसार हे औषध शरीरातील कोरोना संक्रमित पेशींची ओळख पटवून काम सुरू करते. कोणत्याही विषाणूची वाढ होण्यासाठी ग्लूकोजची आवश्यकता असते. जर ग्लूकोज मिळाले नाही, तर हा विषाणू मरतो. ग्लूकोजचा एनालॉग तयार करून निर्माण केलेले हे औषधही याच सूत्रानुसार काम करते आणि शरीरात कोरोनाचे संक्रमण वाढण्यापासून रोखते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

leave a reply