चीनच्या दंडेली व दडपणासमोर तैवान झुकणार नाही

- तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांचा इशारा

तैपेई/बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून टाकण्यात आलेल्या दडपणानंतर दक्षिण अमेरिकेतील गयानाने तैवानबरोबरील करार रद्द केला आहे. चीनच्या या कारवाईवर तैवानकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली असून चीनची दंडेली व दडपणामपुढे तैवान झुकणार नाही, असा इशारा राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी दिला. तैवान व गयानादरम्यान गेल्या महिन्यात व्यापारी व राजनैतिक कार्यालय उभारण्यासाठी करार झाला होता.

गुरुवारी तैवानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या जोआन ओउ यांनी, गयानाबरोबर झालेल्या कराराची माहिती जाहीर करून त्या देशात ‘ट्रेड ऑफिस’ उघडण्यात येत असल्याची घोषणा केली होती. यासंदर्भातील प्राथमिक टप्पे व काम सुरू झाल्याचेही तैवानी प्रवक्त्यांनी सांगितले होते. गयानातील अमेरिकेच्या दूतावासानेही याचे स्वागत केले होते. मात्र तैवान व अमेरिकेच्या वक्तव्यानंतर चीनने त्यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती.

संबंधित देशाने तैवानबरोबर अधिकृत कार्यालय उघडण्याचे टाळावे आणि यापूर्वी झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, असा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाने दिला होता. या इशार्‍यानंतर काही तासातच गयानाने तैवानबरोबरील करार रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. चीनबरोबरचे आमचे संबंध अत्यंत मौल्यवान असून आम्ही हेच धोरण पुढेही कायम ठेऊ, असे निवेदन गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी दिले.

गयानाच्या या माघारीवर तैवानकडून तीव्र नाराजी नोंदविण्यात आली असून, गयानाने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचे तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी चीनवर जोरदार टीकास्त्र सोडून, तैवानी जनता कितीही अडथळे आले तरी झुकणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही चीनच्या भूमिकेवर टीका केली. चीन तैवानविरोधात दादागिरी तसेच दडपशाहीचे धोरण राबवित असल्याचा आरोप परराष्ट्र विभागाने केला.

गेल्या काही वर्षात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून तैवानविरोधात आक्रमक कारवाया सुरू आहेत. तैवानशी राजनैतिक संबंध ठेवणार्‍या देशांवर चीनकडून आर्थिक व राजनैतिक पातळीवरून दडपण आणून त्यांना संबंध तोडण्यास भाग पाडण्यात येत आहे. सध्या जगातील १५ देशांचे तैवानबरोबर राजनैतिक संबंध असून यात काही ‘पॅसिफिक आयलंड नेशन्स’चा समावेश आहे.

leave a reply