ब्रिटनला पुन्हा महासंघात सामील करण्यासाठी ‘डीप स्टेट’चा कट

- ब्रिटनच्या पंतप्रधानांचा आरोप

‘डीप स्टेट'लंडन – ब्रिटनला पुन्हा युरोपिय महासंघात सामील करण्यासाठी विरोधी पक्ष लेबर पार्टी तसेच ‘डीप स्टेट’ काम करीत आहेत. मी सत्तेतून बाहेर पडताच यासाठी हालचाली सुरू होतील, असा आरोप ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी केला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतेच सत्तेवर आल्यावर हा निर्णय घेतील, असा दावा पंतप्रधान जॉन्सन यांनी केला.

‘डीप स्टेट'आपल्याच पक्षाचा विश्वास गमावलेल्या पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर पद सोडण्याची नामुष्की ओढावली. सप्टेंबर महिन्यात जॉन्सन आपल्या पदाचा कार्यभार सोपवणार आहेत. त्याआधी सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षामध्ये पंतप्रधानपदासाठी निवडणूक सुरू आहे. रिषी सुनाक, पेनी मॉरडाँट आणि लिझ ट्रूस हे या शर्यतीत आघाडीवर आहेत.

सोमवारी ब्रिटनच्या संसदेत आपल्या विरोधकांवर टीका करताना, पंतप्रधान जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट रिव्हर्स’ होईल, असा दावा केला. लेबर पार्टी या विरोधी पक्षाचे नेते केर स्टार्मर आणि डीप स्टेट यासाठी हालचाली करीत असल्याचा ठपका जॉन्सन यांनी ठेवला. केर स्टार्मर यांनी हे आरोप फेटाळले असून पंतप्रधान बोरीस जॉन्सन भ्रमात जगत असल्याचा टोला लगावला.

जनतेने निवडून न दिलेल्या व जनतेशी कुठल्याही स्वरुपाची बांधिलकी नसलेल्या पण अत्यंत प्रभावाशाली व्यक्तींचा गट, म्हणजे ‘डीप स्टेट’ असे मानले मानले जाते. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी डीप स्टेटचा उल्लेख करून सर्वांचे लक्ष वेधूनघेतल्याचे दिसते आहे.

leave a reply