इराण-तुर्कीमध्ये आठ सामंजस्य करार

सामंजस्य करारतेहरान – ‘अस्ताना’ बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या इराण व तुर्कीमध्ये आठ सामंजस्य करार पार पडले. सुरक्षा, क्रीडा विकास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर उभय देशांचे एकमत झाले. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या उपस्थितीत हे करार संपन्न झाले.

तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची इराण भेट उभय देशांमधील संबंध सुधारण्याच्या हालचालींना वेगळे वळण देणारी घटना ठरेल, असा दावा इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला. इराण व तुर्कीतील व्यापारी सहकार्य 30 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उभय देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी मान्य केले. तर इराण व तुर्कीच्या सुरक्षेसाठी धोका ठरणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी इराणने तुर्कीला सहाय्य करावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी यावेळी केले.

सिरियातील कुर्द बंडखोरांवरील तुर्कीच्या लष्करी कारवाईचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी यावेळी समर्थन केले. तसेच इराणने देखील तुर्कीच्या या कारवाईला पाठिंबा द्यावा, अशी मागणी एर्दोगन यांनी केली. पण तुर्कीच्या सिरियातील लष्करी कारवाईला रशिया व इराणचा पाठिंबा मिळालेला नाही.

leave a reply