मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत व ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्य महत्त्वाचे ठरते

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

कॅनबेरा – मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षणविषयक सहकार्य फार मोठे योगदान देणारे असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला. दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया भेटीवर असलेल्या जयशंकर यांची ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्याशी चर्चा पार पडली. त्याच्या आधी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली होती. भारत व ऑस्ट्रेलिया इतर देशांचे सहकार्य घेऊन इंडो-पॅसिफिक क्षेत्राला योग्य तो आकार देत असल्याचा दावा यावेळी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युक्रेनचे युद्ध, भारताचे रशियाबरोबरील सहकार्य तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची भारताची भूमिका परखडपणे मांडली होती. विशेषतः भारत व रशियाचे संरक्षणविषयक सहकार्य अमेरिकेमुळेच विकसित झाल्याचे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाश्चिमात्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेकवार शस्त्रास्त्रांची मागणी करूनही अमेरिकेने भारताला शस्त्रे पुरविण्यास नकार दिला. त्याऐवजी अमेरिकेने पाकिस्तानच्या हुकूमशहांना शस्त्रे पुरविण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे भारताला रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून रहावे लागले, याची जाणीव जयशंकर यांनी भारत व रशियाच्या सहकार्यावर ठपका ठेवणाऱ्या पाश्चिमात्यांना करून दिली होती. या परखड विधानांमुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया दौरा गाजत आहे.

दरम्यान, मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षणविषयक सहकार्य फार मोठे योगदान देत असल्याचे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या सहकार्याचा पुरस्कार केला. चीनच्या वर्चस्ववादी कारवायांमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात निर्माण झालेल्या असमतोलाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे ऑस्ट्रेलियाबरोबरील हे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते, ही बाब जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे सुचविली आहे. त्याचवेळी भारताचे चीनबरोबरील संबंध ताणलेले आहेत, हे देखील जयशंकर यांनी स्पष्टपणे मांडले.

गेल्या अडीच वर्षाचा कालावधी भारत व चीनच्या संबंधांसाठी अतिशय अवघड होता, असा दावा करून जयशंकर यांनी पुन्हा एकदा चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना लक्ष्य केले. ऑस्ट्रेलियातील ख्यातनाम अभ्यासगट असलेल्या लोव्ही इन्स्टीट्यूटमध्ये बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनबरोबरील या ताणलेल्या संबंधांची माहिती दिली. भारत व चीनमध्ये 40 वर्षानंतर रक्तपात झाला व गलवानमधील संघर्षात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी स्वतःहून चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्याशी फोनवरून संपर्क साधून इथली परिस्थिती चिघळू देऊ नका, असे आवाहन केले होते, अशी माहिती यावेळी जयशंकर यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाचे सरकार, वरिष्ठ अधिकारी आणि विश्लेषक चीनपासून आपल्या देशाला संभवणाऱ्या धोक्याबाबत वारंवार इशारे देत आहे. या धोक्याविरोधात ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबर सहकार्य वाढविले असून भारताबरोबरील आपल्या सहकार्याला ऑस्ट्रेलिया विशेष महत्त्व देत आहे. याचे परिणाम दिसू लागले असून चीनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात व्यापारी निर्बंधांचे हत्यार उगारले होते. तसेच चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कणखर भूमिका स्वीकारून भारताबरोबरील सर्वच पातळ्यांवरील सहकार्य व्यापक केले आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना चीनबाबत केलेल्या या विधानांचे महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply