संरक्षणमंत्री राजनाथ सिंग रशिया दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध पेटेल अशी स्थिती असताना संरक्षणमंत्र्यांचा तीन दिवसाचा रशिया दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यात त्यांची रशियाबरोबर सुखोई विमाने, पाणबुड्या आणि टी-९० रणगाड्यांसाठी साहित्याच्या तत्काळ पुरवठ्यावर चर्चा होणार असल्याच्या बातम्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने येत आहे. तसेच वायुसेनेकडून ३३ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि मिग-२९ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर झाल्यानंतर रशियाने ही विमाने शक्य तितक्या लवकर पुरविण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या या दौऱ्याला फार मोठे सामरिक महत्व आले आहे.

India-Russiaसोव्हिएत रशियाने दुसऱ्या महायुद्धात मिळविलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी भारताच्या संरक्षणमंत्र्यांना चार दिवसांपूर्वी आमंत्रण दिले होते. त्याचवेळी चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहिद झाले आणि भारत-चीन सीमेवर तणाव प्रचंड वाढला आहे. असे असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रशियाचे आमंत्रण स्वीकारले होते.

या तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यात राजनाथ सिंग रशियाचे संरक्षणमंत्री जनरल सर्जेइ शोयगु यांच्यासह रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. भारताला रशिया बनावटीची सुखोई-३० विमाने, पाणबुड्या आणि टी-९० रणगाड्यांचे सुट्टे भाग आणि साहित्याची त्वरित आवश्यकता आहे. याचा तात्काळ पुरवठा व्हावा. तसेच तत्काळ या साहित्यांची भारताची आवश्यकता लक्षात घेता समुद्री मार्गाऐवजी रशियाने याचा पुरवठा हवाई मार्गाने करावा, अशी मागणी रशियाकडे करण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. तसेच रशियाकडून एस-४०० क्षेपणस्तरभेदी यंत्रणाही लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही भारताकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

RAJNATH-SINGHभारताचा चीनबरोबरील सीमावाद पेटलेला असताना रशियाने भारताच्या मागे उभे राहण्याचे संकेत दिले होते. रशियाने भारताला लढाऊ विमाने पुरविण्याची तयारी दाखवून चीनला धक्का दिल्याची बाब माध्यमांकडून लक्षात आणून दिली जात आहे. कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील प्रमुख देश चीनवर संतापलेले असून रशियाची भूमिका याहून वेगळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच चीन आपल्या आर्थिक सामर्थ्याच्या बळावर झपाट्याने प्रगती करीत असून यामुळे जगात रशियाचे स्थानाला धक्का बसत असून रशियाचे हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव या देशाचे विश्लेषक करून देत आहेत.

काही काळापूर्वी रशियाकडून संरक्षण साहित्य खरेदी करणारा चीन रशियन तंत्रज्ञान चोरून त्याची देशांतर्गत निर्मिती करीत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे अमेरिकेच्या विरोधात रशिया चीनचे सहकार्य घेत असला तरी चीन पूर्णपणे विश्वास ठेवण्यासारखा मित्र देश नसल्याची रशियाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच रशिया भारत चीन वादात भारताच्या बाजूने उभे राहण्याचे संकेत देत आहे.

leave a reply