चीनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानकडून तायचुंग बंदरावर अँटी शिप मिसाईल्स तैनात

तैपेई/बीजिंग – चीनकडून तैवानवर हल्ले चढविण्याविषयी वारंवार धमकावण्यात येत असतानाच तैवानकडून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तैवानमधील महत्त्वाचा संरक्षणतळ असणाऱ्या ‘तायचुंग बेस’वर नवी ‘अँटी शिप मिसाईल्स’ तैनात करण्यात आल्याची माहिती तैवानच्या नौदलाने दिली. काही दिवसांपूर्वीच चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तैवानविरोधातील युद्धात तायचुंग बंदरावर पहिला हल्ला चढवेल, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ही तैनाती महत्त्वाची मानली जाते.

तैवानच्या ‘युडीएन’ या वेबसाईटने नव्या क्षेपणास्त्र तैनातीची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार तायचुंगवरील नौदल तळावर ‘सिऊंग फेंग 3’ क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. ‘सिऊंग फेंग 3’ हे मध्यम पल्ल्याचे सुपरसॉनिक मिसाईल असून त्याचा पल्ला सुमारे 400 किलोमीटर्सचा असल्याचे सांगण्यात येते. तैवानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणस्त्राचा पल्ला दीड हजार किलोमीटर्सपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

ही क्षेपणास्त्रे युद्धनौकांवरही तैनात केली जाऊ शकतात. तैवानने यापूर्वी काही विनाशिका तसेच गनबोट्सवर क्षेपणास्त्रे तैनात केल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्रांचे उत्पादन वाढविण्याचे आदेश तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी दिले होते. तैवानच्या सागरी हद्दीची सुरक्षा वाढविण्याच्या हेतूने हे आदेश देण्यात येत असल्याचे र्इंग-वेन यांनी सांगितले होते. तायचुंग तळावरील तैनातीपाठोपाठ तैवानच्या सहा विनाशिकांवर ‘सी स्वोर्ड 2’ ही ‘एअर डिफेन्स मिसाईल’ तैनात करण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी अमेरिकी अभ्यासगट ‘प्रोजेक्ट 2049’ने ‘होस्टाईल हार्बर्स: तैवान्स पोर्टस्‌ ॲण्ड पीएलए इन्व्हॅजन प्लॅन्स’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात चीनकडून तैवानविरोधातील युद्धात महत्त्वाच्या बंदरांना लक्ष्य करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. तायचुंग बंदर तैवानमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर असून चीनच्या संरक्षणदलांनी आखलेल्या ‘ॲम्फिबियस वॉरफेअर’साठी मोक्याची जागा ठरु शकते, असेही अहवालात बजावण्यात आले होते. तायचुंगबरोबरच काओहसिउंग व अन्पिंग ही बंदरेदेखील चीनच्या हल्ल्याचे प्राथमिक लक्ष्य ठरु शकतात, असे अमेरिकी अभ्यासगटाने म्हंटले होते.

गेल्याच महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी तैवानच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून आक्रमक शब्दात इशारा दिला होता. तैवानचा मुद्दा चीनची कम्युनिस्ट राजवट कधीही सोडणार नाही, असे जिनपिंग यांनी बजावले होते. जिनपिंग यांच्या या इशाऱ्यापूर्वी, चीनने तैवानच्या सामुद्रधुनीसह ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात तब्बल दीडशे ‘स्टेल्थ’ लढाऊ विमाने तैनात केल्याचे समोर आले होते. चीनच्या संरक्षणदलांनी तैवानच्या क्षेत्रातील हालचालीही वाढविल्या असून युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमानांकडून सातत्याने धडका मारणे सुरू आहे. चीनने तैवानवरील आक्रमणाची रंगीत तालीम म्हणून ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धसराव केल्याचेही समोर आले आहे.

leave a reply