सिरियात इजिप्तच्या जवानांची तैनाती

इदलिब – सिरियातील अस्साद राजवटीच्या समर्थनार्थ संघर्ष करण्यासाठी इजिप्तचे १५० जवानांचे पथक इदलिबमध्ये दाखल झाले आहेत. तुर्कीच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली. इजिप्तच्या लष्कराची सिरियातील ही तैनाती सर्वात मोठी घडामोड ठरत आहे. यामुळे लिबिया पाठोपाठ सिरियातही इजिप्त व तुर्कीचे लष्कर एकमेकांसमोर आल्याचे दिसत आहे.

Syriaतुर्कीच्या सरकार संलग्न वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी वाहनांमध्ये रायफल्सनी सज्ज असलेले किमान १५० जवान हमा मार्गे इदलिबमध्ये दाखल झाले आहेत. अलेप्पो प्रांताच्या पश्चिमेजवळील साराकीब शहरात ’खान अल-असल’ भागात इजिप्तचे जवान उतरले आहेत. सिरियातील अस्साद राजवटीच्या सुरक्षेसाठी इजिप्तच्या जवानांची ही तैनाती झाली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‍सचे जवान व इराणसंलग्न दहशतवाद्यांबरोबर इजिप्तचे जवान सिरियातील तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांच्या विरोधात गस्त घालत असल्याचे तुर्कीच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

इजिप्तबरोबर इराणने देखील या भागातील आपली तैनाती वाढविली आहे. त्यामुळे येत्या काळात इराणचे जवान, इराणसंलग्न दहशतवादी आणि इजिप्तचे जवान या भागात येत्या काळात मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचा दावा तुर्कीने केला आहे. इराण व इ्जिप्त एकत्र येऊन इदलिबमधील संघर्षबंदी मोडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप तुर्कीच्या या वृत्तसंस्थेने केला आहे. सिरियातील इदलिब हा प्रांत तुर्कीच्या दक्षिण सीमेजवळ असून या भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी तुर्कीने जोरदार हल्ले चढविले होते. पण पुढे रशियाच्या मध्यस्थीने या भागात संघर्षबंदी लागू करण्यात आली.

तुर्कीने केलेल्या या आरोपांवर इजिप्त, इराण किंवा सिरियाकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण इजिप्तच्या जवानांची ही तैनाती सिरिया तसेच लिबियातील संघर्षात वाढ करणारी ठरेल, असे बोलले जाते. याआधीच लिबियातील संघर्षात तुर्की आणि इजिप्तमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून या संघर्षाची ठिणगी सिरियातही पडणार असल्याचे दिसत आहे.

leave a reply