महिन्याभरात देशात कोरोनाचे १० लाख नवे रुग्ण आढळले

- देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ लाखांवर

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. बुधवारी देशात ५२ हजार नवे रुग्ण आढळले होते, तर गुरुवारीही देशात ५० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसातच देशात एक लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तर आठवडाभरात तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना बाधितांची नोंद देशभरात झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत १० लाख कोरोना रुग्ण देशभरात आढळले आहेत. तसेच महिन्याभरात या साथीने दगावलेल्यांची १७ हजाराहून ३५ हजारांच्या पुढे गेली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाच्या १.८२ कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर भारतात दर दिवशी कोरोनाच्या ५ लाख चाचण्या होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. तसेच भारताची लोकसंख्या लक्षात घेता केवळ लसीकरणाद्वारेच कोरोनाला रोखले जाऊ शकते, तोपर्यंत भारतीयांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे कडक पालन करायला हवे असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव आर. भूषण यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी महाराष्ट्रात २६६ रूग्ण दगावले, तर ११,१४७ नव्या रूग्णांची नोंद झाली. मुंबईत ५३ जण दगावले असून १२२३ नवे रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर ६० टक्यांवर आला असला तरीही दिवभरात ११ हजाराहून अधिक रूग्ण वाढल्याने चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेशात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात या राज्यात १० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची भर पडली तर ६८ रूग्ण दगावले आहेत. कर्नाटकात ६,१२८ रूग्ण सापडले असून एका दिवसात ८३ रूग्ण दगावले आहेत. तामिळनाडूतही ३१ ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या राज्यात एका दिवसात ९७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५,८६४ कोरोनाबधित रूग्ण आढळले आहेत.

राजधानी दिल्लीत १०९३ रूग्ण सापडले असून या साथीमुळे २९ जणांचा मृत्य झाला आहे. दिल्लीत कोरोनाचा वाढता प्रभाव बघता १४ ऑगस्ट पर्यंत उच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ४५० कोरोनाबधित रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी जम्मूत ८३ तर काश्मीर विभागात ३६७ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. गुरुवारी गुजरातमध्ये २४, तेलंगाणा १२, बिहार आणि झारखंडमध्ये प्रत्येकी ९ रुग्णांचा मृत्य झाला आहे.

दरम्यान रूग्णांची वाढती संख्या पाहता देशभरात आणखी काही शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करण्यात आला असून अन्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

leave a reply