‘कालापानी’मध्ये नेपाळी नागरिकांच्या घुसखोरीवरून भारताचा नेपाळला इशारा

नवी दिल्ली – कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखमध्ये काही नेपाळी नागरिक अवैध्यरित्या दाखल होत असल्याचे समोर आले आहे. नेपाळने कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखसह ३९५ चौरस किलोमीटरचा भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखविल्यानंतर ही घुसखोरी सुरु झाली आहे. भारताने याची दखल घेऊन या भागात नेपाळी नागरिकांच्या अवैध हालचाली थांबवा, असा स्पष्ट संदेश नेपाळ सरकारला दिला आहे. यानंतर हा भाग आपला असल्याचा दावा करीत भारत या भागात नेपाळी नागरिकांचा प्रवेश रोखू शकत नाही, असे नेपाळने म्हटले आहे. यावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे सरकार संकटात असून भारताबरोबर वाद वाढवून आपल्या सरकारवरील संकट टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

India-Nepal-kalapaniसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग याच्या हस्ते उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीपासून धारचुलाला जोडणार्‍याव्यूहरचनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. यानंतर नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधूरा यांना आपल्या नवीन नकाशामध्ये दाखवून भारताला चिथाविले होते. यामुळे भारत व नेपाळच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. नेपाळकडून घेण्यात येत असलेले भारतविरोधी निर्णय आणि भूमिकेमागे चीनची फूस असल्याचे विश्लेषकांनी स्पष्ट केले होते.

आता या भागात नेपाळने अनधिकृतपणे नागरिकांना घुसवायला सुरूवात केली आहे. नेपाळच्या सत्ताधारी चीन धार्जिण्या कम्युनिस्ट पक्षाकडूनच सीमेवर घुसखोरीचे हे प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले जाते. भारतीय सीमेत अवैध्य शिरकाव करणाऱ्या नेपाळी नागरिकांना रोखा. अशा प्रकारच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांच्या हितसंबंधांमध्ये तणाव निर्माण होईल, असा इशारा भारताने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात नेपाळी जनतेची घुसखोरी वाढवली असून सीमारेषेवर भारताने एसएसबी जवानांची तैनाती वाढवली आहे. पण नेपाळ सरकार तरीही आपल्या जनतेला या भागात घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरला लागून असलेल्या भागात नेपाळने नवी चौकी उभारायला घेतली आहे. तर उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील टनकपूर भागात नेपाळी जनतेची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे भारतानेही या भागात गस्त वाढवली आहे. नेपाळमध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान आपली खुर्ची वाचविण्यासाठी नवा वाद निर्माण करीत असल्याचा दावा केला जातो.

leave a reply