कोरोनाच्या लसींसाठी विमानतळांवर तयारी

नवी दिल्ली – कोरोनाच्या लस येण्यास अवकाश असला तरी लस येताच त्याची वाहतूक व्यवस्थित व्हावी यासाठी विमानतळांवर तयारी सुरू झाली आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त कार्गो हाताळण्याबरोबर एअरपोर्टवर तापमान नियंत्रित करण्यात आलेले कार्गो युनिट तैनात करण्यात येत आहेत. शितगृहांची व्यवस्थाही तपासली जात आहे. तसेच लस वाहतूक करणाऱ्या विमानांसाठी स्लॉटही उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.

कोरोनच्या लसीसंदर्भात अलीकडेच काही दावे समोर आले आहेत. क्लिनिकल चाचण्यांमध्ये 90 ते 95 टक्के परिणाम दिसून आल्याचे दावे काही कंपन्यांनी केले आहेत. याशिवाय भारतात विकसित होत असलेल्या लसींच्या चाचण्याही अंतिम टप्प्यात आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच लस येईल असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच देश या लसींच्या खरेदीसाठी सरसावले असून आगाऊ बुकींग करण्याची स्पर्धा लागली आहे.

भारत सरकारही फायझर, मॉडर्ना, सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, झायडस कॅडीला या कंपन्यानाबरोबर भारत सरकार संपर्कात आहे. या कंपन्या विकसित करीत असलेल्या लसीच्या चाचण्यांच्या परिणामांबद्दल सरकारकडून जाणून घेण्यात येत आहे. यातील सिरम आणि मॉडर्ना या कंपन्यांनी आपली लसींच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि सिरमने एकत्रित विकसित केलेल्या लसीची दोन डोसची किंमत हजार ते बाराशे असेल, असे नुकतेच सिरमने जाहीर केले होते. तर रविवारी अमेरिकी कंपनी मॉडर्नने आपल्या लसीची किंमत भारतात 1800 ते 2800 असेल असे जाहीर केले.

या पार्श्‍वभूमीवर भारतातही तयारी चालू झाली आहे. चार दिवसांपूर्वी पंतप्रधानांनीही लस आल्यानंतरच्या वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता देशातील विविध विमानतळे आणि राज्यांमध्येही ही लसी ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली जात आहेत. विमानतळांमवरच विशेष व्यवस्था केली जात असून तापमान नियंत्रणात असलेली कार्गो युनिट तैनात केली जात आहेत. जवळील शीतगृहांची व्यवस्थाही तपासली जात आहे. भारताची लोकसंख्या पाहता कोरोनाच्या लसींच्या वाहतुकीसाठी व्यापक व्यस्थेची आवश्‍यकता आहे. या लसींच्या मागणी असलेल्या जिल्ह्यांच्या ठिकाणांपर्यंत कमी वेळेत लस पोहोचवण्यासाठी वेगाने हालचालीची आवश्‍यकता असून प्रवासी विमान कंपन्याही यासाठी आपली काही विमाने उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत. तसेच विमानतळांकडून या लसींची वाहतूक करणाऱ्या विमानासाठी स्लॉट उपलबद्ध करून देताना लवचिकता दाखविण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.

दरम्यान देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 91 लाखांजवळ पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात दरदिवशी आढळणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली गेली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून 45 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद नोंद देशभरात होऊ लागली आहे. शनिवारी 45 हजार 376 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. दिवाळीनंतर सर्वच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने राज्यांमध्ये पाठविण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

leave a reply