इस्रायलबरोबरच्या सहकार्यावरुन सौदीच्या राजघराण्यात मतभेद

लंडन – सौदी अरेबियाचे अरब मित्रदेश संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन, सुदान आणि मोरोक्को या देशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान देखील इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी तयार आहेत. पण सौदीच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्य व क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांचे चुलत भाऊ प्रिन्स तुर्की अल-फैझल या सहकार्याच्या पूर्ण विरोधात आहेत. सौदीच्या राजघराण्यातील या मतभेदाची बातमी ब्रिटनमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली आहे.

गेल्या दोन महिन्यांमध्ये चार अरब देशांनी इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित केले व येत्या काळात सौदी व इतर अरब देश देखील यात सहभागी होतील, अशी घोषणा अमेरिकेने केली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी नोव्हेंबर महिन्यात सौदीच्या निओम शहराचा गोपनीय दौरा करून सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांची भेट घेतल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. तर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या सहकार्यासाठी तयार असल्याच्या बातम्या आखातातील माध्यमांनी दिल्या होत्या. पण सौदीच्या राजघराण्याने या बातम्या फेटाळल्या.

पुढे कतारमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना सौदीच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख प्रिन्स तुर्की अल-फैझल यांनी इस्रायलचे पंतप्रधान खोटारडे असल्याची टीका केली. तसेच इस्रायल हा वसाहतवादी देश असून पॅलेस्टिनींच्या भूभागाचा ताबा मिळविणार्‍या इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित होऊ शकत नाही, असा दावा प्रिन्स तुर्की यांनी केला होता. ब्रिटनमधील वर्तमानपत्राने याचा दाखला देऊन सौदीच्या राजघराण्यात इस्रायलबरोबरच्या सहकार्यावरुन मतभेद असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील सौदीचे माजी राजदूत असलेले प्रिन्स बंदार बिन सुलतान यांनी पॅलेस्टाईनवर टीका केली होती. सौदी व अरब देशांकडून सहाय्य घेणारे पॅलेस्टिनी नेते सध्या इराण व तुर्कीचे गुणगान करीत असल्याचे ताशेरे प्रिन्स बंदार यांनी ओढले होते. ही बाब सौदीच्या राजघराण्यातील मतभेद दर्शवित आहे, याकडेही ब्रिटनच्या वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

leave a reply