चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षणमंत्र्यांची इस्रायली संरक्षणमंत्र्यांबरोबर चर्चा

नवी दिल्ली – चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी इस्रायली संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारताला संरक्षणसाहित्य पुरविणाऱ्या देशांमध्ये इस्रायल हा आघाडीचा देश मानला जातो. गलवान व्हॅली संघर्षानंतर भारताने संरक्षण सज्जतेला वेग दिला असून इस्रायलसह अमेरिका, रशिया, फ्रान्स, दक्षिण कोरिया या देशांकडून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्याची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेली चर्चा या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

Israel-Indiaगलवान व्हॅलीत चीनला दिलेल्या दणक्यानंतर भारताने सीमेवरील आपले धोरण अधिक आक्रमक केले आहे. चीनला जोडून असलेल्या सीमाभागात भारताने मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती सुरू केली असून, त्यासाठी संरक्षणक्षेत्रातील आपले प्रमुख भागीदार असलेल्या देशांबरोबर भारत सातत्याने संपर्कात आहे. इस्रायलसह सर्व प्रमुख देशांनी भारताकडून करण्यात आलेल्या संरक्षणसाहित्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुरवठ्याचा वेग वाढवण्याचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी इस्रायली संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत राजनाथ सिंग यांनी याच मुद्द्यावर भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारत व इस्रायलमधील सामरीक सहकार्याच्या प्रगतीबाबत दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. संरक्षणक्षेत्रातील द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. सीमेवरील तणावाचा मुद्दाही संभाषणात उपस्थित करण्यात आला’, असे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले. इस्रायली संरक्षण कंपन्यांनी भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहनही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने इस्रायलला १६ हजार लाईट मशिनगन्सची ऑर्डर दिली होती. त्याचवेळी इस्रायलच्या दोन अतिप्रगत असॉल्ट रायफल्सची निर्मिती लवकरच भारतात होणार असल्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले आहेत. ‘पुंज लॉईड’ व इस्रायलच्या ‘इस्रायल वेपन्स सिस्टिम’ यांनी संयुक्तरित्या उभारलेल्या फॅक्टरीत ‘एराड’ व ‘कार्मेल’ या दोन असॉल्ट रायफल्सची निर्मिती केली जाणार आहे. भारतीय लष्कर इस्रायलकडून ‘स्पाईक फायरफ्लाय’ या ड्रोनची तसेच रणगाडाभेदी क्षेपणास्त्र व हवाईसुरक्षा यंत्रणेचीही खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येते. भारताने २०१७ साली इस्रायलबरोबर दोन अब्ज डॉलर्सहून अधिक संरक्षणसाहित्याच्या खरेदीसाठी करारही केला आहे.

leave a reply