भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा

नवी दिल्ली – अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या तयारीत असताना, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जयशंकर यांनी सोशल मीडियावर या चर्चेची माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा प्राधान्यक्रम आणि कोरोनाच्या साथीमुळे भारतातील आरोग्यविषयक परिस्थिती यावर परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

११ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानातील आपले सारे सैन्य माघारी घेतले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे. मात्र या सैन्यमाघारीसाठी १ मेपर्यंत दिलेली मुदत वाढविण्यास तालिबान तयार नाही. हे अमेरिकेने केलेल्या कराराचे उल्लंघन ठरते व याची जबाबदारी अमेरिकेला घ्यावीच लागेल, अशा धमक्या तालिबानकडून दिल्या जात आहेत. त्याचवेळी तालिबान अफगाणिस्तानात घनघोर संघर्षाची तयारी करू लागल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे सैन्यमाघारीच्या आधी आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेला अफगाणिस्तानात नवी तैनाती करावी लागत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेचे सारे तपशील उघड झालेले नाहीत. मात्र यात अफगाणिस्तानच्या मुद्याचा समावेश असल्याचे संकेत जयशंकर यांनी दिले. भारताच्या शेजारी देशांबाबत यावेळी चर्चा पार पडल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

दरम्यान, या चर्चेच्या आधी जयशंकर यांनी युएईला भेट दिली होती. या भेटीत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान यांच्याशी चर्चा केली. यात दोन्ही देशांमध्ये सर्वच आघाड्यांवरील द्विपक्षीय सहकार्य व्यापक करण्यावर भर देण्यात आला. मात्र भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा हा दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी देखील युएईच्या भेटीवर होते व इथे भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होऊ शकते, असे दावे केले जात होते. दोन्ही देशांनी तशी शक्यता फेटाळलेली असली, तरी युएईच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपण या चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे जाहीर केले आहे.

भारत व पाकिस्तानमधील ही चर्चा युएई घडवून आणत असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात त्यामागे अमेरिकेचे बायडेन प्रशासन असल्याचा दावा पाकिस्तानातील काही पत्रकार करीत आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री जयशंकर व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्यात फोनवरून झालेल्या चर्चेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

leave a reply