फ्रान्सचा पाकिस्तानला राजनैतिक धक्का

- इस्लामाबादमधून १५ राजनैतिक अधिकारी मायदेशी बोलावले

इस्लामाबाद – पाकिस्तानातील आपल्या दूतावासातील सुमारे १५ राजनैतिक अधिकार्‍यांना फ्रान्सने मायदेशी बोलावले आहे. सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन फ्रान्सने हा निर्णय घेतला. हा पाकिस्तानसाठी फार मोठा धक्का ठरतो. गेल्या सोमवारपासून पाकिस्तानच्या सरकारने फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करावी अशी मागणी करणारी हिंसक निदर्शने पाकिस्तानात सुरू झाली आहे. ही समस्या हातळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सदर हिंसक निदर्शनांसाठी आपल्या राजकीय विरोधकांबरोबर भारत जबाबदार असल्याचे खापर फोडले आहे. मात्र तेहरिक-ए-लबैक या संघटनेने केलेल्या मागणीनुसार फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याचे मान्य करून कालांतराने त्याला नकार देणार्‍या पंतप्रधान इम्रान खान यांच्यामुळे पाकिस्तानात ही स्थिती उद्भवली, अशी घणाघाती टीका केली जात आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांवर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस दल व पाकिस्तानी रेंजर्स या निमलष्करी दलाने कारवाई सुरू केली. गोळीबार केल्यानंतरही ही निदर्शने रोखण्यात पोलीस व रेंजर्सना यश मिळाले नाही. काही ठिकाणी लबैकच्या समर्थकांनी पोलीस अधिकार्‍यांना ताब्यात घेतले व त्यांना मारहाण केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या लाहोर शहराची परिस्थिती बिकट बनली असून इतर शहरांमधूनही लबैकला मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच पाकिस्तानच्या सरकारने लबैकवर बंदी टाकण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच या निदर्शनांच्या बातम्यांवर निर्बंध टाकण्याचे आदेश पाकिस्तानच्या सरकारने दिले आहेत.

पोलिसांकडून आपल्यावर होत असलेले अत्याचार जगासमोर येऊ नये, यासाठीच इम्रान खान यांचे सरकार ही कारवाई करीत असल्याचा आरोप लबैक करीत आहे. इतकेच नाही तर सध्या अटकेत असलेले आपले नेते साद रिझवी यांचा छळ होत असल्याच्या बातम्यांमुळे लबैकचे समर्थक अधिकच संतापले आहेत. काही ठिकाणी हे समर्थक व पोलिसांमध्ये चकमकी झाल्याच्याही बातम्या येत आहेत. त्याचवेळी लबैकच्या समर्थकांवर पोलिसांकडून केल्या जाणार्‍या कठोर कारवाईचे व्हिजिओज् सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. पंजाबमधील लाहोरच नाही तर सिंधमधील कराची सारख्या शहरातूनही लबैकला पाठिंबा दिला जात आहे.

मौलाना फजलूर रेहमान या विरोधी पक्षांची मध्यवर्ती संघटना उभी करणार्‍या नेत्यांनी लबैकला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकेच नाही तर ठार झालेल्या आपल्या समर्थकांचे शव घेऊन लबैकचे समर्थक इस्लामाबाद गाठणार असतील, तर त्यांच्यासोबत आपणही असू असे फजलूर रेहमान यांनी जाहीर केले. तर पाकिस्तानातील प्रभावशाली धर्मगुरूंनी देशव्यापी बंदची हाक देऊन आपण लबैकच्या मागे उभे राहणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

या प्रश्‍नावर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये, राजकारणात आणि सरकारमध्येही दोन गट पडल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या एकाने लबैकवरील या कारवाईचा विरोध करून राजीनाम्याची धमकी दिली. यामुळे पाकिस्तानच्या सरकारचे दिवस भरल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान यांनी या लबैकच्या निदर्शनामागे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मौलाना फजलूर रेहमान यांचा हात असल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर भारत या हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचे बेछूट आरोप इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना लगावले.

मात्र या परिस्थितीला दुसरे कुणी नाही, तर खुद्द इम्रान खानच जबाबदार असल्याचे पाकिस्तानच्या माध्यमांचे म्हणणे आहे. आधीच्या काळात लबैकच्या मागण्या मान्य करून फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याचे इम्रान खान यांच्या सरकारने कबूल केले होते. पण हे आश्‍वासन पाळता येणे शक्य नव्हते, तर मग अशी ग्वाही सरकारने का दिली? या प्रश्‍नाला अजूनही इम्रान खान यांनी उत्तर दिले नाही. केवळ फ्रान्ससारख्या बड्या देशाच्या विरोधात ही कारवाई करणे पाकिस्तानच्या हिताचे नाही, असे सांगून इम्रान खान आपली सुटका करू पाहत आहेत. त्याने ही समस्या सुटणार नाही. काही तासांपूर्वी बंदी घातलेल्या व दहशवादी ठरविलेल्या लबैकशी चर्चा करण्याची नामुश्की पाकिस्तानच्या सरकारवर ओढावली आहे. ही बाब इम्रान खान यांना कुठल्याही गोष्टीची समज नाही, हेच दाखवून देत असल्याची टीका माध्यमे करीत आहेत.

इम्रान खान यांच्या नाकर्तेपणामुळे पाकिस्तान कोसळण्याची भीती असल्याचे काही पत्रकार सांगू लागले आहेत. विरोधी पक्षनेते असताना इम्रान खान यांनी याच लबैकचा वापर करून आपण पाकिस्तान पेटवून देऊ, असे धमकावले होते, त्याचेही व्हिडिओज् पाकिस्तानच्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

leave a reply