माजी पंतप्रधान जिआबाओ यांच्यामुळे चीनची राजवट अस्वस्थ

बीजिंग – २००३ ते २०१३ या काळात चीनचे पंतप्रधानपद भूषविणारे नेते वेन जिआबाओ सध्या चर्चेत आले आहेत. आपल्या दिवंगत मातेबद्दल लिहिलेल्या एका लेखात जिआबाओ यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी लिहिलेला हा लेख चीनच्या सोशल मीडियावर हजारोजणांनी एकमेकांना पाठविला. त्यानंतर यावर तातडीने बंदी घालण्यात आली. माजी पंतप्रधानांची देखील चिनी राजवटीच्या निर्बंधांच्या तडाख्यातून सुटका होत नाही, ही बाब यामुळे जगजाहीर झाल्याचे शेरे आंतरराष्ट्रीय माध्यमे मारत आहेत. त्याचवेळी चीनच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली धुसफूस यामुळे जगासमोर आली आहे.

डिसेंबर महिन्यात जिआबाओ यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा उल्लेख असलेल्या जिआबाओ यांच्या या लेखात चीनमध्ये माओ त्से तुंग यांनी घडविलेल्या कल्चरल रिव्होल्युशनविषयी माहिती देण्यात आली. प्रमाणिकपणा, न्याय, उदारता आणि स्वातंत्र्य यांचा उत्कर्ष व्हायला हवा, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी अपेक्षा जिआबाओ यांनी या लेखात व्यक्त केली आहे. यात जिआबाओ यांनी सध्याच्या चीनच्या राजवटीची ध्येयधोरणे व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी लक्ष्य केलेले नाही. त्यांच्यावर सौम्यशी टीका करण्याचेही जिआबाओ यांनी टाळले आहे. असे असूनही त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केल्याचे दावे केले जातात.

चीनच्या सोशल मीडियावर हा लेख हजारोजणांनी एकमेकांना पाठविला आहे. त्याला मिळालेली प्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या राजवटीच्या नजरेत भरली असून तातडीने या लेखावर बंदी टाकण्यात आली. मात्र त्याच्या आधीच हा लेख अनेकजणांच्या दृष्टीस पडला आहे. मुख्य म्हणजे यामुळे चीनची राजवट अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले असून यातून एकाच वेळी अनेक संदेश जगाला मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे माओ यांच्यानंतरचे चीनचे सर्वात शक्तीशाली राष्ट्राध्यक्ष मानले जातात. त्यांच्याइतकी सत्ता चीनच्या दुसर्‍या कुठल्याही राष्ट्राध्यक्षांच्या हाती एकवटलेली नव्हती. पण जिनपिंग यांना मात्र सर्वाधिकार मिळालेले आहेत.

याचा वापर करून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याचे सत्र सुरू केले होते. भ्रष्टाचारविरोधी तसेच गैरव्यवहारांच्या विरोधातील कारवाईचे कारण पुढे करून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षावरील आपली पकड भक्कम केली आहे. त्यांच्या विश्‍वासातील मंडळी चीनच्या सत्तास्थानावर असून इथे विरोधकांपैकी कुणाचीही वर्णी लागणार नाही, याची पुरेपूर काळजी जिनपिंग यांनी घेतलेली आहे.

त्याचवेळी चीनमध्ये नागरी स्वातंत्र्यावर अधिकाधिक गदा आणली जात आहे. अशा परिस्थिती सुधारणावादी व प्रगतीशील मानल्या जाणार्‍या वेन जिआबाओ यांच्यासारख्या नेत्यांची अवस्था बिकट बनली आहे. चीनने प्रमाणिकपणा, न्याय, उदारता आणि स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करावा व या दिशेने प्रगती करावी, अशी सूचक शब्दात जिआबाओ यांनी व्यक्त केलेली अपेक्षा म्हणूनच महत्त्वाची ठरते. कारण सध्याच्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या राजवटीचा प्रवास याच्या नेमक्या उलट्या दिशेने सुरू झालेला आहे.

यामुळे चीनच्या राजकारणात सारे काही आलबेल नाही, अंतर्गत पातळीवर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विरोधात नाराजी आहे व त्याचे असंतोषात रुपांतर होऊ शकते, असे स्पष्ट संकेत यामुळे मिळत आहेत. याची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आहे.

leave a reply