भारताचे पंतप्रधान व सौदीच्या क्राऊन प्रिन्सची चर्चा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडली. या चर्चेत भारत व सौदीमधील वाढत्या सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच हे सहकार्य अधिक व्यापक करण्यावर पंतप्रधान मोदी व सौदीच्या क्राऊन प्रिन्सचे एकमत झाले आहे. याबरोबर कोरोनाच्या साथीच्या विरोधात परस्परांना सहकार्य करण्याचेही उभय नेत्यांनी या चर्चेत मान्य केले.

भारत आणि सौदीमध्ये २०१९ साली द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीविषयक आयोगाची (बायलॅटरल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप काऊन्सिल) स्थापना करण्यात आली होती. दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक व संरक्षणविषयक सहकार्य गतीमान करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाच्या प्रगतीचा आढवा पंतप्रधान मोदी व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला. तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्था वेग पकडत असताना, सौदी गुंतवणूकदारांसमोर असलेल्या नव्या संधींची माहिती दिली.

भारत आणि सौदीमधील व्यापार वाढू लागला असून २०१८-१९ सालात २७ अब्ज डॉलर्सवर असलेला उभय देशांमधील वार्षिक व्यापार २०१९-२० सालात ३४ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. पुढच्या काळात हा द्विपक्षीय व्यापार अधिकच वेग घेईल, असे दावे केले जातात. पंतप्रधान मोदी व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी उभय देशांमधील या वाढत्या सहकार्यावर समाधान व्यक्त केले. तसेच कोरोनाच्या साथीविरोधात उभय देशांमधील सहकार्य अधिक प्रमाणात वाढविण्याचेही दोन्ही नेत्यांनी मान्य केले.

याच्या बरोबरीने क्षेत्रिय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर तसेच उभय देशांच्या हितसंबंधांवरही भारताच्या पंतप्रधान पंतप्रधानांची सौदीच्या क्राऊन प्रिन्सशी चर्चा झाली. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उभय देशांच्या नागरिकांमधील संवाद वाढविण्यावरही पंतप्रधान मोदी व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी भर दिला. या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सना भारतभेटीचे आमंत्रण दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनाद्वारे दिली.

सध्या आखाती क्षेत्रात फार मोठा राजकीय उलथापालथी सुरू आहेत. सौदी अरेबिया व सौदीसमर्थक मित्रदेश सध्या इस्रायलबरोबरील सहकार्य दृढ करीत आहेत. विशेषतः युएईसारख्या देशाने इस्रायलबरोबरील संबंधांना विशेष महत्त्व दिल्याचे समोर येत असून यामागे सौदी अरेबिया असल्याचे दावे केले जातात. त्याचवेळी हे सहकार्य आपल्या विरोधात असल्याचे म्हणणे आहे. तर अमेरिकेचे बायडेन प्रशासन देखील इस्रायल व सौदी तसेच इतर आखाती देशांच्या सहकार्याकडे संशयाने पाहत असल्याचे दावे केले जातात.

अशा परिस्थितीत सौदीच्या क्राऊन प्रिन्सची भारताच्या पंतप्रधानांबरोबर झालेली चर्चा लक्षवेधी ठरते. भारताचे सौदी अरेबियाबरोबरील सहकार्य अधिकाधिक दृढ बनत चालले असून भारताच्या लष्करप्रमुखांनी काही महिन्यांपूर्वी सौदीचा दौरा केला होता. या दौर्‍यानंतर दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी सरावाची घोषणा झाली होती. भारत व सौदीचे नौदल देखील सराव करणार होते, पण कोरोनाच्या साथीमुळे हा सराव पुढे ढकलावा लागला होता. भारताचे सौदी अरेबियाबरोबरील हे सहकार्य पाकिस्तानसाठी घातक ठरेल, अशी चिंता पाकिस्तानचे विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply