भारताकडून ८४ देशांना संरक्षणसाहित्याची निर्यात

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात भारतातून मोठ्या प्रमाणात संरक्षणसाहित्याची निर्यात करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. मात्र कोणत्या देशांना या संरक्षणसाहित्याचा पुरवठा करण्यात आला, ते धोरणात्मक कारणांमुळे उघड करता येणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षात देशातून मोठ्या प्रमाणावर संरक्षणसाहित्य निर्यात होऊ लागले आहे. या काळात भारताने ८४ देशांना संरक्षणसाहित्याचा पुरवठा केला आहे. वेमन सिम्युलेटर, टोर्पेडो लोडिंग मॅकेनिजम, वॉर्निंग अ‍ॅण्ड कन्ट्रोल सिस्टिम, नाईट व्हिजन मोनोक्युलर, हलक्या वजनाचे टोर्पेडो सारख्या साहित्यांचा या निर्यातीत समावेश असल्याचे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणाले.

देेशातून संरक्षणसाहित्याची निर्यात वाढावी, त्यामध्ये सुलभता यावी यासाठी सरकारने गेल्या सहा वर्षात कितीतरी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. संरक्षणसाहित्यांच्या निर्यातीमध्ये वाढ व्हावी यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’मध्येही (एसओपी) बदल करण्यात आले. निर्यात करू शकणार्‍या शस्त्र व संरक्षण साहित्यांच्या यादीतही सुधारणा कराण्यात आली, असे नाईक यांनी स्पष्ट केले. ‘ओपन जनरल एक्सपोर्ट लायसन्स’ (ओजीईएल) बाबत सरकारने आधिसूचना काढली आहे. याद्वारे या क्षेत्रातील उद्योगांना ठराविक सहित्याच्या निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे नाईक यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात केेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पुढील पाच वर्षात पाच अब्ज डॉलर्सच्या संरक्षणसाहित्याच्या निर्यातीचे लक्ष्य समोर ठेवल्याची माहिती दिली होती. हे लक्ष्य भारत साध्य करील, असा विश्‍वासही संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला होता. २०१८-१९ सालात देशातून १०७४५ कोटी रुपयांच्या संरक्षणसाहित्यांची निर्यात करण्यात आली. ही निर्यात २०१६-१७ सालाच्या तुलनेत सात पट होती.

leave a reply