सीमावादावरील चीनबरोबरील चर्चा अपयशी ठरली

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादावरील चर्चा निष्फळ ठरल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढच्या काळातही एलएसीवरील दोन्ही देशांची तैनाती कायम राहणार असून इथला तणाव इतक्यात निवळणार नाही, संकेत राजनाथ सिंग यांनी दिले आहेत. त्याचवेळी दुसर्‍या देशाच्या सीमेत शिरून दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची क्षमता भारताकडे असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी बजावले आहे. याद्वारे संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचे दिसते. भारत आणि चीनमध्ये लडाखच्या एलएसीवरील वाद सोडविण्यासाठी चर्चेच्या आठ फेर्‍या संपन्न झाल्या होत्या. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला एलएसीवरील तणाव कमी झालेला नाही. काही आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये हा वाद मिटविण्यावर सहमती झाल्याचे वृत्त आले होते. पण आता संरक्षणमंत्र्यांनीच उभय देशांमधील यासंदर्भातील चर्चा अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुढच्या काळातही लडाखच्या एलएसीवरील दोन्ही देशांची तैनाती कायम राहणार असून इथला तणाव निवळण्याची शक्यता अधिकच धुसर बनल्याचे दिसत आहे.

चीनच्या विस्तारवादाबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना संरक्षणमंत्र्यांनी जगातला कुठलाही देश भारताची भूमी हिरावून घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले. भारताकडे आपल्या भूभागाचे संरक्षण करण्याची धमक व क्षमता असून आवश्यकता भासल्यास चीनच्या विरोधात त्याचा वापर करताना भारत कचरणार नाही, असा संदेश याद्वारे संरक्षणमंत्र्यांनी दिला. याआधीही संरक्षणमंत्र्यांनी चीनला उद्देशून असे परखड इशारे दिले होते. दरम्यान, चीनबरोबरील सीमावादाबाबत बोलत असताना पाकिस्तानच्या दहशती कारवायांवर भारताची करडी नजर रोखलेली आहे, याची जाणीव संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी करून दिली.

सीमेपार धडक मारून दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे सामर्थ्य भारताच्या संरक्षणदलांकडे असल्याचे राजनाथ सिंग म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी एलओसीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा दावा केला होता. आपल्या अंतर्गत समस्यांकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पाकिस्तान एलओसीवर कारवाई करून संघर्ष छेडील, अशी दाट शक्यताही या अधिकार्‍यांनी वर्तविली होती.

leave a reply