देशातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या २० वर

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे आणखी १४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या कारोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या देशातील रुग्णांची संख्या २० वर गेली आहे. एकट्या उत्तर प्रदेशात १० रुग्ण आढळले असून यामध्ये एका दोन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. यानंतर उत्तर प्रदेशात आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्यास बजावण्यात आले आहे.

देशात २५ नोंव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत भारतात ३३ हजार प्रवासी ब्रिटनमधून दाखल झाले. यातील केवळ ११४ प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. या पॉझिटिव्ह आढळलेल्यांचे नमुने देशातील १० निरनिराळ्या ‘इंडियन सार्स-कोव्ह-२ जिनोमिक्स कन्सोर्टियम लॅब’मध्ये (इन्साकॉग) पाठविण्यात आले. यापैकी ६ जणांच्या जिनोम सिक्वेन्स तपासल्यानंतर त्यांना ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या म्यूटेशन झालेल्या विषाणूची लागण झाल्याचे मंगळवारी उघड झाले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती जाहीर केली होती. मात्र रात्रीपर्यंत ही संख्या ८ वर गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० वर गेल्याचे जाहीर केले.

बंगळुरूच्या इन्साकॉग लॅबमध्ये पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी सात जणांना या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हैदराबादमध्ये दोन जणांना, पुण्यातील लॅबमध्ये आलेल्या नमुन्यांपैकी एकाला, कोलकात्यातही एका जणाला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाला आहे. याशिवाय दिल्लीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अ‍ॅण्ड इंटेग्रेटीव्ह बायोलॉजी’मध्ये (आजीआयबी) चाचणीसाठी आलेला एकाला नव्या स्ट्रेनची बाधा झाली आहे. तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल (एनसीडीसी) लॅबमध्ये आलेल्या नमुन्यांमधील आठ नमूनेही कोरोनाच्या विषाणूच्या नव्या प्रकारचे आहेत.

कोरोनाच्या नव्या प्रकारची बाधा झालेले सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशातील १० जणांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका दोन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. हे कुटुंब नुकतेच ब्रिटनमधून भारतात आले होते. मात्र या मुलीच्या आईवडीलांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. उत्तर प्रदेशानंतर कर्नाटकात नव्या स्ट्रेनचे सात रुग्ण आढळले आहेत. गेल्या एका महिन्यात ब्रिटनमधून भारतात आलेल्या सर्वच प्रवाशांना ट्रॅक केले जात आहे. मात्र अद्याप शेकडो जणांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. त्यांचे मोबाईल बंद येत आहेत. उत्तर प्रदेशात एकूण १६५५ जण ब्रिटनमधून परतले आहेत. मात्र यातील ५६५ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

दरम्यान, बुधवारी देशात २० हजार ५४९ नवे रुग्ण आढळले. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या २५ टक्क्यांनी जास्त आहे. मंगळवारी देशात १६ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले होते. देशात आतापर्यंत आढलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ कोटी २ लाख ५१ हजारांच्या पुढे गेली आहे. यापैकी ९८ लाख ३९ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एक लाख ४८ हजार ५०३ जणांचा या साथीने आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७० हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

leave a reply