तैवानकडून अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक फ्रेमवर्क’मधील सहभागासाठी प्रयत्न

वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घोषणा केलेल्या ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’मध्ये सहभागासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी घोषणा तैवान सरकारकडून करण्यात आली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या कारवाया व ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’ला शह देण्यासाठी अमेरिकेने ही योजना समोर आणल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीने तैवाननजिक असणार्‍या अमेरिकी तळाला भेट दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

तैवानकडून अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक फ्रेमवर्क’मधील सहभागासाठी प्रयत्नचीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तैवानबरोबरील वाढते सहकार्य, सातत्याने होणारी लष्करी तैनाती व सराव आणि ‘क्वाड’ हा त्याचाच भाग मानला जातो. यापाठोपाठ अमेरिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांबरोबर व्यापारी संबंध विकसित करण्यासाठी नवी योजना समोर आणली आहे. ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’ असे त्याचे नाव असून या वर्षभरात ती सक्रिय करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या योजनेत अमेरिकेचे मित्रदेश असणारे जपान, ऑस्ट्रेलिया, भारत यासारखे देश सहभागी होणार असून ‘आसियन’ देशांच्या सहभागासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांनी गेल्या काही महिन्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रात केलेल्या दौर्‍यात यासंदर्भात चाचपणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

तैवानकडूनही चीनविरोधातील आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी हालचाली सुरू असून ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’मध्ये सहभागाचा प्रस्ताव त्याचाच एक भाग ठरतो. यापूर्वी तैवानने पॅसिफिक क्षेत्रातील ‘सीपीटीटीपी’ या व्यापारी करारातील सहभागासाठीही अर्ज केला आहे. ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’सह या करारात तैवानला सहभागी करून घेतल्यास ही बाब चीनसाठी मोठा धक्का ठरु शकते. चीनने व्यापारी सहकार्य तसेच आर्थिक बळाच्या जोरावर अनेक देशांना आपल्या कलाने निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. तैवानचा वाढता सहभाग चीनच्या या धोरणाला धक्के देणारा ठरु शकतो.

दरम्यान, अमेरिकेची आण्विक पाणबुडी ‘युएसएस नेवाडा’ने पॅसिफिक महासागरातील अमेरिकी संरक्षणतळ गुआमला भेट दिल्याचे समोर आले आहे. यावेळी पॅसिफिक क्षेत्रातील तैवाननजिकच्या क्षेत्रातून प्रवास केल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीने या क्षेत्रात प्रवास करण्याची व गुआमला भेट देण्याची ही गेल्या काही वर्षातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते. आपल्या मित्रदेशांना आश्‍वस्त करण्यासाठी ही भेट होती, अशी माहिती अमेरिकी नौदलाकडून देण्यात आली आहे.

चीनकडून तैवानविरोधात आखण्यात येणार्‍या आक्रमणाच्या योजनांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका व जपानने परस्परांमधील संरक्षणसहकार्य अधिक व्यापक करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, तैवाननजिक असलेल्या अमेरिका तसेच जपानच्या तळांवर क्षेपणास्त्र व इतर महत्त्वाच्या शस्त्रसामुग्रीचा साठा करून ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

leave a reply