पर्यायी ‘सप्लाय चेन’साठी भारत-जपान-ऑस्ट्रेलिया सक्रिय

नवी दिल्ली – भारत, जपान व ऑस्ट्रेलियाने व्यापार क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. उत्पादनांशी निगडीत विश्वासार्ह पुरवठ्याची साखळी (सप्लाय चेन) विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, व्यापार व गुंतवणूकीतील अडथळे दूर करण्यासाठी स्वतंत्र चौकट तयार करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ‘सप्लाय चेन रिझिलन्स इनिशिएटिव्ह’ अंतर्गत (एससीआरआय) ही चौकट उभारण्यात येणार असून, त्यासाठी ‘ट्रॅक १.५ डायलॉग’ला अंतिम रूप देण्याची तयारीही चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर, जपानने आपल्या दोन कंपम्यांना त्यांचे चीनमधील कारखाने भारतात हलविण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचे संकेत दिले आहेत.

'सप्लाय चेन'

काही महिन्यांपूर्वी भारत जपान व ऑस्ट्रेलियाच्या व्यापारमंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत जपानने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात ‘सप्लाय चेन’ उभारण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. त्यावर तिन्ही देशांचे एकमतही झाले होते. या तिन्ही देशांनी ‘सप्लाय चेन’साठी १० उत्पादने व सेवाही निश्चित केल्या आहेत. यापूर्वी जपानने सुरू केलेल्या ‘आसियन-जपान इकॉनॉमिक रिझिलन्स अ‍ॅक्शन प्लॅन’ व “इंडिया-जपान इंडस्ट्रियल कॉम्पिटिटिव्हनेस पार्टनरशिप” या योजनांच्या आधारावर भारत जपान व ऑस्ट्रेलियामध्ये स्वतंत्र चौकट विकसित करण्याचे संकेतही देण्यात आले होते. चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्यासाठी व चिनी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

'सप्लाय चेन'

मुक्त वातावरणात पारदर्शी व्यापार व गुंतवणूक करणे, हे प्रमुख ध्येय या तीन देशांनी समोर ठेवले आहे. सप्लाय चेन तयार करताना औद्योगिक पार्कची उभारणी, व्यापार व गुंतवणूकीतील अडथळे दूर करण्याची यंत्रणा, व्यापारविषयक कागदपत्रांचे डिजिटलायझेशन, व्यापारासाठी सागरी व हवाई मार्गाच्या सुविधा वाढविणे, यावर स्वतंत्र चौकटीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे. या चौकटीत ‘ट्रॅक १.५ डायलॉग’चा समावेशही असून, त्याअंतर्गत उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांना सामील करण्यासाठी विचार सुरू असल्याचेही सांगण्यात येते.

दरम्यान, जपानने चीनमधून बाहेर पडणाऱ्या ‘टोयोटा-त्सुशो’ व ‘सुमिदा’ या दोन कंपन्यांना भारतात कारखाने उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचे संकेत दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी जपानने चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्यांना मदत करण्याची योजना जाहीर केली होती. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी जागतिक गुंतवणूकदारांशी बैठक पार पडली. या बैठकीनंतर जपानी गुंतवणूकदारांबरोबर स्वतंत्र चर्चाही झाली. त्यानंतर जपानी सूत्रांकडून दोन कंपन्यांच्या मदतीचे संकेत देण्यात आले आहेत. दोन जपानी कंपन्यांपैकी ‘टोयोटा-त्सुशो’ भारतात ‘रेअर अर्थ’ खनिजांशी संबंधित कारखाना उभारेल, असे सांगण्यात येते.

leave a reply