सीमावादाचा प्रभाव भारत-चीन व्यापारावर पडू देऊ नका

- चीनच्या 'ग्लोबल टाईम्स'चे आवाहन

नवी दिल्ली/बीजिंग – चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची भारतीयांनी सुरु केलेली मोहीम यशस्वी ठरूच शकणार नाही, असे दावे चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने केले होते. पण गलवान व्हॅलीतील संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संतप्त भारतीयांनी चिनी उत्पादनांची होळी सुरु केल्यावर चीनचे धाबे दणाणल्याचे दिसत आहे. भारत आणि चीनच्या आर्थिक तसेच व्यापारी संबंधांवर सीमावादाचा परिणाम होऊ देऊ नका, असे आवाहन ग्लोबल टाईम्सने केले आहे. भारताच्या सीमेवर केलेल्या आगळिकीची जबर आर्थिक किंमत आपल्याला चुकती करावी लागणार आहे, याची जाणीव चीनला झाली आहे आणि चीनच्या सरकारी मुखपत्राने काहीसा नरमाईचा सूर लावल्याचे दिसत आहे.

GlobalTimesयाआधी चीनच्या सरकारी माध्यमांमधून भारतात होणाऱ्या चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या आवाहनाची कित्येक वेळा खिल्ली उडविण्यात आली होती. भारतात चिनी मालावर बहिष्कार कधीही यशस्वी ठरणार नाही. कारण चिनी उत्पादने भारतीय समाजाचा एक भाग बनली आहेत, अशा शब्दात चीनच्या सरकारी माध्यमांनी भारतीयांना खिजवले होते. तसेच आधीच्या काळात चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमा अपयशी ठरल्या होत्या याची आठवणही ग्लोबल टाईम्सने भारतीयांना करून दिली होती. भारताचे उत्पादन क्षेत्र खूपच मागासलेले असून भारत या आघाडीवर चीनची बरोबरी करू शकत नाही, असा दावा ‘ग्लोबल टाईम्स’ने याआधी वेळोवेळी केला होता.

मात्र लडाखमध्ये चीनच्या विश्वासघातामुळे भारताचे २० सैनिक शहीद झाल्यावर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या आवाहनांची आणि त्याला भरतीयांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची धग चीनला जाणवू लागल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या लेखातून दिसून येत आहे. म्हणूनच सीमावादाचा परिणाम दोन्ही देशांच्या आर्थिक व व्यापारी संबंधांवर पडता कामा नये असे आवाहन ग्लोबल टाईम्सने केले आहे. भारताने शेजारी शत्रू बनविण्यापेक्षा मित्र बनवावेत असा सल्ला, यावेळी या चिनी मुखपत्रातून देण्यात आला आहे. मात्र हे आवाहन करीत असताना चीनसारख्या बड्या देशावर भारताची आर्थिक प्रगती अवलंबून आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न ग्लोबल टाईम्समधील या लेखात करण्यात आला आहे. चीनमधूनच भारतात सर्वात जास्त गुंतवणूक होते, भारतातील ३० मोठ्या स्टार्टअप पैकी १८ मध्ये चीनची गुंतवणूक आहे, याची आठवण चीनच्या या सरकारी मुखपत्राने करून दिली आहे.

घरघुती सामान, टीव्ही, मायक्रोवेव्ह, एअर कंडिशनर, मोबाईल फोन्स, लॅपटॉप यासारख्या वस्तू भारतात चीनमधून आयात होतात चीनमधून भारताला खूपच कमी किंमतीत सामान मिळते. मात्र भारताने चीनसोडून इतर ठिकाणावरून हे सामान आयात केले, तर तुलनेत त्याची खूपच जास्त किंमत चुकती करावी लागले, याकडे चीनच्या सरकारी मुखपत्राने लक्ष वेधले आहे. थोडक्यात भारताला चांगल्या दर्जाचे स्वस्त सामान मिळणे कठीण आहे, असे या लेखातून चीनच्या या सरकारी मुखपत्राने लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे काही जणांकडून करण्यात येणाऱ्या बहिष्काराच्या आवाहनाच्या पाठीमागे धावून भारतीयांनी मूर्ख बनू नये आणि चिनी सामानावर बहिष्कार टाकू नये”, असे चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले आहे.

India-Chinaदरम्यान, देशातील सात कोटी व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कॅट) दिल्लीत चिनी सामानाची होळी केली. किरकोळ व्यापारी आता ग्राहकांना चिनी माल खरेदी करू नका यासाठी जागृत करणार असल्याचे कॅटने म्हटले आहे. याआधी ‘कॅट’ने बंदी घालणे शक्य असलेल्या ५०० ‘मेड इन चायना’ वस्तूंची यादीच जाहीर केली होती. केवळ व्यापारी संघटना, भारतीय ग्राहकच नाही, सरकारने देखील चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्याचा सपाट सुरु केला असून महाराष्ट्र सरकारने नुकताच चिनी कंपनीबरोबर पार पाडलेले पाच हजार कोटींचे तीन करार रद्द केले आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा सरकारनेही अशाच पद्धतीचे निर्णय घेतले असून रेल्वेही चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्याच्या तयारीत आहे. बीएसएनएलनेही चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची देशांतर्गतच निर्मितीसाठी केंद्र सरकार व्यापक धोरण आखत आहे. यासाठी लवकरच एका श्वेत पत्रिका तयार केली जाणार आहेत. यानुसार देशी उद्योगांना प्रोत्साहन देऊन देशांतर्गत निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या कंपन्यांना सवलती देण्यात येणार आहेत. भारताच्या एकूण आयातीत चीनचा हिस्सा जवळपास १४ टक्के आहे. पण पुढच्या काळात चीनकडून होणारी ही आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार आक्रमकपणे पावले उचलत असून चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करून सरकारने आपला प्राधान्यक्रम निश्चित केल्याचे दिसत आहे. म्हणूनच झळ बसू लागलेल्या चीनने आपल्या मुखपत्रातून भारतीयांना आवाहन केल्याचे दिसत आहे.

आजवर भारताबरोबरील द्विपक्षीय व्यापारात चीन दरवर्षी ८० अब्ज डॉलर्सचा व्यापारी लाभ उकळत आला आहे. असे असूनही चीनचे भारताच्या हितसंबंधांची कधीही पर्वा केली नाही. पण आता चीनबरोबर हिशेब चुकती करण्याची वेळ आली आहे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया भारतीयांकडून दिली जात आहे.

leave a reply