अफगाणिस्तानच्या नेतृत्त्वाकडे तालिबानशी लढण्याची इच्छाशक्ती आहे का?

- व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांचा सवाल

वॉशिंग्टन – ‘तालिबानविरोधी संघर्षासाठी अफगाणिस्तानच्या संरक्षणदलांकडे आवश्‍यक असलेले संख्याबळ, शस्त्रास्त्रे आणि पुरेसे प्रशिक्षण आहे. या संघर्षासाठी आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे का? याचा निर्णय अफगाणिस्तानच्या नेतृत्वाला घ्यायचा आहे. ही इच्छाशक्ती असेल तर अफगाणी एकजूट होऊन तालिबानविरोधात लढू शकतात व सध्या याचीच जास्त आवश्‍यकता आहे’, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या नेतृत्त्वाकडे तालिबानशी लढण्याची इच्छाशक्ती आहे का? - व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांचा सवालकाही तासांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातील वेगवान सैन्यमाघारीचे समर्थन केले होते. तसेच अफगाणिस्तानातील संघर्षात अमेरिकेने हजारो जवान गमावले, ट्रिलियन डॉलर्स खर्च केले असून यापुढे या देशाची जबाबदारी अफगाण सरकारवर असेल, असे बायडेन म्हणाले होते. तालिबानच्या तुलनेत अफगाणी जवानांची संख्या मोठी असून त्यांनीच तालिबानशी लढा द्यावा, अशी अपेक्षा बायडेन यांनी व्यक्त केली होती.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या साकी यांनी अफगाणिस्तानच्या नेतृत्वाला केलेला सवाल देखील बायडेन यांच्या विधानांना समर्थन देणारा ठरतो. अफगाणिस्तानच्या लष्कराला हवाई हल्ल्यांद्वारे सहाय्य पुरविण्याचे अमेरिका यापुढेही सुरू ठेवील, असे साकी म्हणाल्या. पण भविष्यात अफगाणिस्तानची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यासाठी अफगाणी नेत्यांनाच एकजूट करावी लागेल, असे आवाहन साकी यांनी केले. गेल्या आठवड्याभरापासून अमेरिकेची लढाऊ, बॉम्बर विमाने आणि ड्रोन अफगाणिस्तानात हल्ले चढवित असल्याचा दावा केला जातो.अफगाणिस्तानच्या नेतृत्त्वाकडे तालिबानशी लढण्याची इच्छाशक्ती आहे का? - व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांचा सवाल

अमेरिकेने हेल्मंड, कंदहारमधील हवाई हल्ल्यांसाठी बी-1बी स्टेल्थ बॉम्बर व एमक्यू-9 रिपर ड्रोनचा वापर केल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिकेने 31 ऑगस्टनंतरही अफगाणिस्तानातील हवाई मोहीम सुरू ठेवावी, असे आवाहन अमेरिकेतील अफगाणिस्तानचे राजदूत अदेला राझ यांनी केले.

दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी सध्या मझार-ए-शरिफच्या भेटीवर असून येथे अफगाणी नेत्यांची तातडीची बैठक सुरू आहे. तर अफगाणिस्तानातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व जर्मनीने आपल्या नागरिकांना तातडीने हा देश सोडण्याची सूचना केली आहे.

leave a reply