इराणविरोधी कारवाईसाठी इस्रायल सौदीच्या थेट संपर्कात

- इस्रायलचे मंत्री इसावी फ्रेज यांचा दावा

इसावी फ्रेजतेल अविव – ‘आखातातील इराणच्या वाढता प्रभावाचा सामना करणारा इस्रायल सौदी अरेबिया व इतर आखाती देशांच्या थेट संपर्कात आहे’,अशी खळबळ उडविणारी माहिती इस्रायली अरब मंत्री इसावी फ्रेज यांनी दिली. येत्या काळात सौदीसह आखाती देशांबरोबर इस्रायलचे संबंध सहकार्य वाढेल, अशी अपेक्षा फ्रेज यांनी व्यक्त केली. याआधीही इस्रायलच्या नेत्यांनी सौदीबरोबरच्या छुप्या सहकार्याची माहिती दिली होती. पण सौदीने सदर बातम्या खोडून काढल्या होत्या.

दोन महिन्यांपूर्वी इस्रायलच्या सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या सरकारमधील फ्रेज हे एकमात्र इस्रायली-अरब नेते आहेत. क्षेत्रीय सहकार्य विभागाचे मंत्री असलेल्या फ्रेज यांनी अमेरिकास्थित एका अरबी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये इराणच्या वाढत्या प्रभावाची आणि इस्रायल व आखाती देशांमधील सहकार्याची माहिती फ्रेज यांनी दिली. ‘इराणचा सामना करण्यासाठी इस्रायलचे सौदी व आखाती देशांबरोबर थेट संपर्क आणि मतैक्य आहे’, असे फ्रेज म्हणाले.

‘इराणपासून असलेला धोका केवळ इस्रायल आणि सौदीच्या सुरक्षेशी संबंधित नाही, तर हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा असून याविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्‍यकता आहे’, असे आवाहन फ्रेज यांनी केले. इस्रायल आणि आखाती देशांबरोबरच्या सहकार्याबाबत बोलताना फ्रेज यांनी संयुक्त अरब अमिरात-युएईचा उल्लेख केला. इस्रायलचे सर्व स्तरांवरील अधिकारी युएईतील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात असतात, अशी माहिती इस्रायलच्या क्षेत्रीय सहकार्य विभागाच्या मंत्र्यांनी दिली.

युएईबरोबरच्या सहकार्याचा भाग म्हणून दोन्ही देशांमधील सौरऊर्जा, इंधन पाईपलाईनसंबंधित प्रकल्पांच्या पुर्तीसाठी इस्रायलचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे फ्रेज म्हणाले. त्याचबरोबर गाझापट्टीच्या दक्षिणेकडील भागात युएईसोबत औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे फ्रेज यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गेल्या दशकभरापासून जॉर्डनबरोबरच्या संबंधात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी देखील बेनेट सरकारने पावले उचलल्याचे इस्रायली मंत्र्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार असतानाही इराणविरोधात इस्रायल आणि सौदीमध्ये सहकार्य असल्याचे दावे करण्यात येत होते. इस्रायली मंत्र्यांनी तसे दावे केले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेत्यान्याहू यांनी सौदीच्या निओम शहरात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतल्याचे इस्रायली नेत्यांनी जाहीर केले होते. पण सौदीने इस्रायलबरोबर संपर्क, सहकार्य असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या.

दोन दिवसांपूर्वीच इस्रायल व युएईतील अब्राहम कराराचे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वागतही केले. या करारामुळे या क्षेत्रातील परस्पर विश्‍वास वाढल्याचा दावा केला. त्याचबरोबर इस्रायलविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या हमासच्या 69 दहशतवाद्यांना सौदीने शिक्षा सुनावली आहे. पण पॅलेस्टाईनचा मुद्दा तडीस गेल्याशिवाय इस्रायलबरोबर सहकार्य शक्य नसल्याचे जाहीर करून सौदीने आवश्‍यक ती दक्षता घेतल्याचेही दिसत आहे.

leave a reply