‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ चीनच्या सुरक्षेसाठी धोकादायक

- कॅनडाच्या अभ्यासगटाचा इशारा

बीजिंग/काबुल – चीनच्या झिंजिआंग प्रांतातील उघुरवंशियांची ‘द ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’(इटीआयएएम) ही संघटना चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरु शकतो, असा इशारा कॅनडाच्या अभ्यासगटाने दिला आहे. तालिबानने या संघटनेशी असलेले संबंध तोडावेत, यासाठी चीन व पाकिस्तान प्रयत्न करीत असले तरी प्रत्यक्षात तालिबानने त्याला विशेष प्रतिसाद दिला नसल्याचेही समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच, अमेरिका अफगाणिस्तानमधून माघार घेत असतानाच चीनने लष्करी संघर्षासाठी सज्ज रहावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले होतेे. अमेरिकेच्या माघारीमुळे झिंजिआंगमधील उघुरवंशियांना तळ मिळेल, असा दावा यावेळी चिनी राजवटीकडून करण्यात आला होता.

‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ चीनच्या सुरक्षेसाठी धोकादायक - कॅनडाच्या अभ्यासगटाचा इशारागेल्या महिन्यात तालिबानच्या शिष्टमंडळाने चीनला भेट दिली होती. त्यावेळी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी, ‘इटीआयएएम’ ही चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचे तालिबानी शिष्टमंडळाला बजावले होते. ‘इटीआयएएम’ झिंजिआंग प्रांताबरोबरच चीनच्या पाकिस्तानमधील हितसंबंधांनाही धक्के पोहोचवेल, असा दावा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. गेल्या महिन्यात दासु प्रकल्पात झालेल्या बॉम्बस्फोटात ‘इटीआयएएम’ व ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी गटांचा सहभाग असल्याचे आढळले होते. त्यानंतर चीनने ‘इटीआयएएम’संदर्भातील आपली भूमिका अधिक आक्रमक केल्याचे समोर येत आहे.

‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ चीनच्या सुरक्षेसाठी धोकादायक - कॅनडाच्या अभ्यासगटाचा इशारा‘इटीआयएएम’ आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. या गटाचा अफगाणिस्तानमधील कुंदुझ, तखर व बदाख्शन या प्रांतामध्ये प्रभाव आहे. ‘इटीआयएएम’च्या दहशतवाद्यांनी सिरियातील संघर्षात सहभाग घेतल्याचेही समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर, कॅनडाच्या ‘द इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स ॲण्ड सिक्युरिटी’ या अभ्यासगटाने ही संघटना चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरु शकतो, असा दावा केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ‘इटीआयएएम’ला दहशतवादी गटांच्या यादीतून काढून टाकले होते, याकडेही अभ्यासगटाने लक्ष वेधले आहे.

चीनने गेल्या काही वर्षात उघुरवंशियांविरोधातील अत्याचारांची तीव्रता वाढविल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. याचा वापर करून ‘इटीआयएएम’सारखी संघटना आपला प्रभाव वाढवेल व हल्ले चढवेल, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. त्याचवेळी ‘एशिया टाईम्स’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तात तालिबान ‘इटीआयएएम’बरोबरील संबंध पूर्णपणे तोडणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तालिबानचे वरिष्ठ नेतृत्त्व चीन व पाकिस्तानला आश्‍वासन देत असले तरी तालिबानचे कमांडस यासाठी तयार नसल्याचे ‘एशिया टाईम्स’च्या वृत्तात म्हंटले आहे.

leave a reply