देशांतर्गत विमानसेवा सुरू

५३२ विमानांचे उड्डाण

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरु झाली. पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून पुण्याला पहिले विमान झेपावले. देशभरात आज ५३२ विमानांनी उड्डाण केले असून ३९२३१ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईहून पहिले विमान पाटण्याला रवाना झाले. मुंबई विमानतळावरून दररोज ५० विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे. काही राज्यांनी विमान सेवेला अनुमती न दिल्याने व मर्यादा घातल्याने ६३० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे २ महिन्यांपासून देशांतर्गत विमानसेवा बंद होती. अखेर देशांर्तगत विमान सेवा सुरु झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी विमानतळावर घेण्यात येत आहे. विमानतळावर वैयक्तिक तपासणीसह सामानाची तपासणी केल्यावर सर्व बॅगांवर औषध फवारणी करुन त्या निर्जंतुक केले जात आहे. नागरिकांना थर्मल स्क्रीनिंग करुन प्रत्येक प्रवाशाचे टेंपरेचर गनद्वारे शरीराचे तापमान तपासण्याच्या सूचना आहेत. यासह प्रत्येक प्रवाशाला मास्क आणि हँडग्लोव्ह्ज घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर विमानांतील कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालण्याच्या सूचना नागरी उड्डयण मंत्रालयाने दिल्या आहेत. यानुसार सोमवारी विमानतळांवर आणि विमानात सर्व खबरदारी विमान सेवा देणाऱ्या कंपन्या घेताना दिसत होत्या.

काही राज्यांनी विमान सेवेला नकार दिला आहे. तर काही राज्यांनी मर्यादित विमानांना परवानगी दिल्याने दिवसभरात ६३० उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबई, चेन्नई आणि हैदराबादसारख्या प्रमुख विमानतळांवर मर्यादित विमानांना परवानगी देण्यात आल्याने काही विमानांची उड्डाणे रद्द झाली. दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये २६ मे आणि पश्चिम बंगालमध्ये २८ मे पासून विमान सेवेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालने सुरुवातीला प्रतिदिन २० उड्डाणास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता विमान सेवा सुरु न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मुंबईतुन प्रतिदिन २५ विमानांचे टेकऑफ आणि लँडिंगला होणार आहे. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि जम्मू-काश्मीर अशा काही राज्यांनी विमान सेवा सुरु करताना प्रवाशांच्या क्वारंटाईनबाबत वेगळी नियमावली तयार केली आहे.

leave a reply