‘फ्लाईंग बुलेट्स’ तेजसच्या दुसर्‍या स्क्वाड्रनने सज्ज होणार

कोइंबतूर – १९७१ सालच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात जबरदस्त कामगिरी बजावणारी भारतीय वायुसेनेचे ‘फ्लाईंग बुलेट्स’ युनिट ‘तेजस’ लढाऊ विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनने सज्ज होणार आहे. येत्या बुधवारी तामिळनाडूचे सुलूर हवाई तळ स्वदेशी बनावटीच्या तेजसच्या दुसऱ्या स्क्वाड्रनने सुसज्ज असेल, अशी घोषणा वायुसेना प्रमुख ‘आर. के. एस. भदोरिया’ यांनी केली. तर कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असताना देखील भारताला रफायल लढाऊ विमाने वेळेतच पुरविली जातील, असे फ्रान्सने स्पष्ट केले आहे. चीन आणि पाकिस्तानकडून सीमेवर भारताला आव्हान दिले जात असताना, तेजस आणि रफायलबाबत आलेली ही बातमी भारतीय वायुसेनेसाठी लक्ष वेधून घेणारी ठरते.

‘काश्‍मीर खोऱ्याचा संरक्षक’ अशी ओळख असलेल्या या फ्लाईंग बुलेट्स स्क्वाड्रनने १९७१ सालच्या युद्धात श्रीनगरमध्ये विमाने उतरवून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यावर्षी १ एप्रिल रोजी या स्क्वाड्रनची फेररचना करण्यात आली. यानंतर अवघ्या दोन महिन्यात याच स्क्वाड्रनमध्ये तेजसची तैनाती केली जात असून सामरिकदृष्ट्या ही बाबत अत्यंत महत्त्वाची ठरते. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सीमेजवळ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तर चीनने देखील लडाखच्या सीमेजवळ लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या तैनाती केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, काश्मीर खोर्‍यातील मोहिमेचा फार मोठा अनुभव गाठीशी असलेल्या स्क्वाड्रनमध्ये तेजसची तैनाती निराळेच संकेत देत आहे.

लढाऊ विमानांच्या चौथ्या श्रेणीतील प्रगत विमान असलेल्या स्वदेशी तेजसची निर्मिती झाल्यापासून त्यात नवनवीन बदल करण्यात येत आहेत. जगभरातील आघाडीच्या काही विमानांमध्ये आता तेजसचही समावेश होऊ लागला असून इतर देश देखील तेजसच्या खरेदीसाठी उत्सुक असल्याच्या बातम्या येत आहेत. वायुसेनेत सहभागी होणारे तेजसचे हे दुसरे स्क्वाड्रन आहे. दोन महिन्यांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने वायुसेनेला आणखी ८३ तेजस विमानांच्या खरेदीची मंजुरी दिली होती. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात असलेल्या रशियन बनावटीच्या मिग-२७ लढाऊ विमानांची जागा देशी बनावटीची तेजस विमाने घेतील, असा विश्वास व्यक्त केला जातो. याचा फार मोठा लाभ देशातील संरक्षण उद्योगाला होणार आहे.

तेजसचे दुसरे स्क्वाड्रन वायुसेनेत सहभागी होत असताना, फ्रान्सने भारताला पुरविण्यात येणाऱ्या रफायल विमानांबाबत महत्त्वाची घोषणा केली. कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असले तरी, फ्रान्स भारताला निर्धारित वेळेतच रफायल पुरविल, असे फ्रान्सने म्हटले आहे. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी ही माहिती दिली.

leave a reply