‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची निवड

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारतील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जपानचे डॉ. हिरोकी नकतानी सध्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी असून त्याच्या जागी हर्ष वर्धन यांची निवड झाली आहे. साध्य कोरोनाव्हायरसच्या संकटाने जगाला ग्रासले आहे. अमेरिकेने चीनला जगाला या भयंकर संकटात ढकलण्यासाठी जबाबदार ठरविले आहे. नुकतीच अमेरिकेच्या धमकीनंतर व सुमारे ६५ देशांच्या विनंतीनंतर ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाच्या स्वतंत्र चौकशीला मान्यता दिली आहे. अशावेळी ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपद भारताकडे आले आहे.

तीन वर्षांकरिता कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती करण्याचा निर्णय गेल्यावर्षी पार पडलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समूहाने सर्वसंमतीने घेतला होता. यामुळे डॉ. हर्षवर्धन यांची या पदावर नियुक्ती केवळ औपचारिकता राहिली होती. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद हे पूर्णवेळ नाही. कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात. डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे लागेल. कार्यकारी मंडळाच्या होणाऱ्या या बैठकीपैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. ‘हेल्थ असेम्ब्ली’ नंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. ‘हेल्थ असेम्ब्ली’चे सर्व निर्णय व धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.
यापूर्वी २०१६ साली माजी आरोग्यमंत्री जे.पी नड्डा हे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते.

देशभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. काही देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताकडून ठोस पावल उचलण्यात आली. आरोग्य संघटनेकडून भारताच्या या प्रयात्नांचे कौतुक करण्यात आले होते.

leave a reply